‘बहुलवादी’ संस्कृती हीच भारताची ताकद – पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश

पुणे – भारताकडे जगाचं आध्यात्मिक नेतृत्व करण्याची क्षमता आहे, बहुलवादी संस्कृती हीच भारताची ताकद आहे, असं मत पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी व्यक्त केलं. स्वर्गीय माधवी मोहनदास नवलाखा स्मृती प्रतिष्ठान आणि पुणे युथ अँड सोशल फाऊंडेशन आयोजित वीरचंद गांधी ट्रॉफी इंटर सोसायटी क्रिकेट टुर्नामेंटचे मुकुंदनगर येथे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उदघाटन कृष्णप्रकाश यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी सरहद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे, महाराष्ट्र ऑलिंपिक्स असोसिएशनचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड, स्व. माधवी मोहनदास नवलाखा फाऊंडेशनचे नीलेश नवलाखा, पुणे युथ अँड सोशल फाऊंडेशनच्या श्वेता होनराव-कामठे आदी मान्यवर उपस्थित होते.

कृष्णप्रकाश म्हणाले, वीरचंद गांधी यांच्या नावाने हा उपक्रम होतो आहे, ही मोलाची गोष्ट आहे. त्यांच्या तात्विक मांडणीने भारताचा आध्यात्मिक धागा पुढं नेण्यात बळ मिळाले. आजच्या काळात जात, धर्म, भाषा या गोष्टींच्या पलीकडे जाऊन एकत्र येणं हे महत्वाचं आहे. स्पर्धेतून नेमकं हेच घडतं. अशा खिलाडू वृत्तीमुळे राज्य, देश आणि मानवता उंचीवर जाऊ शकते.

इंटर सोसायटी क्रिकेट टुर्नामेंट २८ फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणार असून त्यात विविध संघ सहभागी झाले आहेत. सोसायटीतील नागरिकांमध्ये खेळाच्या निमित्ताने एकजूट व्हावी, या हेतूने ही स्पर्धा आयोजित करण्यात आल्याचे नीलेश नवलाखा यांनी प्रास्ताविकात सांगितले. श्वेता होनराव यांनी मनोगत व्यक्त केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.