पुणे – ‘महिलांनी सर्वांसाठी चालविलेली बँक अशी ओळख असलेल्या भगिनी निवेदिता सहकारी बॅंकेचा वर्धापनदिन सोहळा शुक्रवारी (ता.२४) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भगिनी निवेदिता बँकेने यंदा सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केले असून बँकेचे सभासद, खातेदार, ठेवीदार, ग्राहक आणि हितचिंतकांनी यानिमित्ताने बँकेस पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
भगिनी निवेदिता सहकारी बँकेशी दैनिक प्रभातचे अनेक वर्षांपासून ऋणानुबंध आहेत. बँकेच्या सुवर्ण मोहोत्सवी वर्षातील पदार्पणाच्या निमित्ताने प्रभात परिवारातर्फे संस्थेचे सर व्यवस्थापक बी एल स्वामी यांनी पुष्पगुच्छ देत बँकेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी बँकेच्या अध्यक्षा सीए रेवती पैठणकर, उपाध्यक्षा दीपा दाढे, संचालिका ऍड. जयश्री कुरुंदवाडकर, संचालिका जयश्री रावळ, मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता देशपांडे, सर व्यवस्थापक जयश्री चित्रे उपस्थित होत्या.
स्वामी विवेकानंद यांच्या शिष्या बनलेल्या आयरिश वंशाच्या मार्गारेट नोबल या युवतीने भारतात मानवसेवेचे त्यातही महिलांच्या उन्नतीसाठी मोठे काम केले. त्यांचे नामकरण भगिनी निवेदिता असे ठेवले गेले होते. त्यांनी केलेल्या कार्याच्या स्मरणार्थ 24 मार्च 1974 रोजी प्रख्यात चार्टर्ड अकौंटंट विवेक दाढे व त्यांच्या पत्नी मीनाक्षीताई दाढे यांनी या बॅंकेची मुहूर्तमेढ पुण्यात रोवली. त्याचे सुवर्णमहोत्सवी वर्ष यंदापासून सुरु होत आहे. संपूर्ण महिलांनी चालवलेली ही बॅंक हे या बॅंकेचे वैशिष्ट्य आहे.

1974 मध्ये सव्वा दोन लाख रुपयांच्या ठेवींनी 2022 सालापर्यंत तब्बल 918 कोटींचा आकडा गाठला. 1974 च्या 3.5 लाख रुपयांच्या कर्जाची रक्कम 2022 पर्यंत 514 कोटींवर पोहोचली आहे. तर सातत्याने 18 वर्षे बॅंकेने 15 % लाभांश दिला आहे. आज पुणे व सातारा जिल्ह्यात मिळून बॅंकेच्या 18 शाखा कार्यरत आहेत. अनेक पुरस्कारांनी बॅंकेला सन्मानित करण्यात आले आहे.