मुंबई : पक्षांतर व इतर निवडणुकीसाठी राजीनामा द्यावा लागतो. गेल्या पाच महिन्यांपासून राज्यात तीस आमदारांनी पक्षांतर व इतर कारणासाठी राजीनामे दिले आहेत. इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या प्रमाणावर राजीनामे स्वीकारण्याचा विक्रम विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या नावावर नोंदविला गेला आहे.
विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने हरिभाऊ बागडे हे देखील आपल्या फुलंब्री मतदारसंघात तळ ठोकून होते. त्यामुळे राजीनामा देण्यासाठी आमदार किंवा त्यांच्या पदाधिकाऱ्यांना वाड्या, तांडे, वस्त्या पालथ्या घालाव्या लागल्या होत्या.
मेलवर आलेला राजीनामा देखील विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडून स्वीकारला गेला. विधानसभेतील कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यापासून सुरू झालेला हा प्रवास आज नितेश राणे यांनी दिलेल्या राजीनाम्यावर येऊन थांबला आहे.
पाच महिन्यात यांनी दिले राजीनामे
मे ते ऑक्टोबर दरम्यान डॉ. आशिष देशमुख, सुरेश उर्फ बाळूभाऊ धानोरकर, प्रतापराव पाटील चिखलीकर, हर्षवर्धन जाधव, अनिल गोटे, जयदत्त क्षीरसागर, गिरीश बापट, राधाकृष्ण विखे, उन्मेष पाटील, हेमंत पाटील, सय्यद इम्तियाज जलील, पांडुरंग वरोरा, शिवेंद्रसिंह भोसले, वैभव पिचड, कालीदास कोळंबकर, संदीप नाईक, निर्मला गावीत, विलास तरे, दिलीप सोपल, जयकुमार गोरे, राणाजगजितसिंह पाटील, अवधुत तटकरे, अब्दुल सत्तार, अजित पवार, भारत भालके, नितेश राणे यांचा यात समावेश आहे.