नवी दिल्ली : काही दिवसांपुर्वी अमेरिकेच्या कारवाईत इसिसचा मास्टरमाईंड अबू बकर अल-बगदादी मारला गेला होता.दरम्यान, आता बगदादी याच्या मोठ्या बहिणीला तुर्कीमध्ये अटक करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. सोमवारी तुर्कीच्या अधिकाऱ्यांनी याविषयी माहिती दिली. अधिकाऱ्यांनी बगदादीच्या बहिणीसह तिच्या पती आणि सुनेलादेखील ताब्यात घेण्यात आले असून या सर्वांनी कसून चौकशी करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.
उत्तर सिरीयाच्या अजाज शहरात अमेरिकेने कारवाई करत बगदादीला ठार केले होते. दरम्यान, आता तुर्कीमध्ये त्याच्या मोठ्या बहिणीला ताब्यात घेत इसिसविषयी आणखी काही माहिती मिळते का हे चौकशीतून समोर आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. बगदादीच्या बहिणीचे नाव रणस्मिया आवद असून ती 65 वर्षांचा आहे. उत्तर सिरीयात ज्या शहरात बगदादी मारला गेला त्याच अजाज शहराच्या जवळून रणस्मियाला अटक करण्यात आली आहे. आपल्या पाच मुलांसह आणि पती सुना यांच्यासह तिला ताब्यात घेण्यात आले असून इसिसच्या अंतर्गत कामकाजाची माहिती मिळण्याची आशा असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, रणास्मिया ही इसिसला मदत करत होती. इसिसला गुप्त माहिती पुरवण्याचे काम रणास्मिया करत होती. तसेच आता पकडण्यात आलेली महिला ही बगदादीची बहिण आहे की नाही याची अजूनही पुष्टी करण्यात आली नाही कारण बगदादीनंतर त्याच्या कोणत्याही नातेवाईकाविषयी जास्त माहिती उपलब्ध नाही.
बगदादी हा मागील महिन्यात अमेरिकेने केलेल्या कारवाईत ठार झाला. त्याच्यासोबत त्याने पत्नी आणि मुलांचाही अंत झाला होता. त्याच्या मृत्यूला खुद्द इसिसकडुन दुजोरा देण्यात आला होता तसेच बगदादीच्या मृत्यूचा बदला देखील घेणार असल्याची धमकीदेखील इसिसने दिली आहे. यापुर्वी बगदादी ठार झाल्याच्या बातम्या अनेकवेळा समोर आल्या होत्या.