#Video | शासकीय नियम धाब्यावर, बावधनमध्ये काढली बगाड यात्रा

यात्रेपुढं कोरोनाचं भय संपलं ? पालकमंत्र्यांचा कडक कारवाईचा इशारा

कवठे(प्रतिनिधी) – बावधन (ता. वाई) येथील बगाड यात्रा पारंपारिक पध्दतीने आज साजरी करण्यात आली. जिल्हा व तालुका प्रशासनाचे नियम धाब्यावर बसवीत बावधनकरांनी शेकडो वर्षे जुनी परंपरा जपली. 

जुने बगाड गावातच ठेवून नवीन बगाड तयार करीत बावधनकरांनी प्रशासनाला अंधारात ठेवत पहाटेच्या अंधारातच बगाड पारंपारिक पध्दतीने बैलांच्या सहाय्यानेच सकाळी 9.30 च्या सुमारास गावात आणले. यावेळी पोलीस प्रशासनाने अटकाव केला परंतू त्याला ग्रामस्थांनी जुमानले नाही. पोलीस प्रशासनाच्यावतीने गावपुढार्‍यांसह ग्रामस्थांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

पण गाव करेल ते राव करणार नाही. बावधन गावाने राज्यात आपल्या देवासाठी गुन्हे अंगावर घेवून ऐतिहासिक परंपरा जपून एक नवा इतिहास रचून काशिनाथाचे चांगभले या धारदार वाक्याला सामुहिक भक्तीची एक नवी झालर लावल्याने गावकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.

संपूर्ण राज्यात व देशात प्रसिध्द असलेल्या बावधन बगाड यात्रेवर जिल्हा प्रशासन व तालुका प्रशासनाने कोरोना रोगाच्या पार्श्‍वभूमीवर बंदी घातली होती. यामुळे शेकडो वर्षाची परंपरा असलेला बगाड उत्सव बावधन ग्रामस्थ कसा साजरा करणार? याकडे जिल्हयासह राज्याचे लक्ष लागून राहिले होते. तर महसूल व पोलीस प्रशासनानेही बगाड रोखण्यासाठी चंग बांधला होता. यामुळे बावधन गावाला पोलीस छावनीचे स्वरुप आले होते. तरी देखील बगाडया व बगाड पोलीसांच्या शेवटपर्यंत हाती न लागल्याने भाविकांना ही बगाड यात्रा सहजपणे साजरी करता आली.

बगाडासाठी ग्रामस्थांनी कमालीची एकी व जिद्द दाखवत गेल्या महिना भरापासून बगाडाच्या सर्व विषयांची चर्चा कुठल्याही गल्ली बोळात न करता ती सार्वजनिक होवू नये अशी गुप्तता राखली. गेल्या चार दिवसापासून जिल्हा पोलीस दलातील दंगा नियंत्रण पथकाची एक तुकडी गावाच्या चावडीशेजारी असणार्‍या चौकात लावण्यात आली होती. खडा पहारा गावात असूनही पोलीसांना शेवटपर्यंत बगाडया कोण हे समजू शकले नाही तर रातोरात बैलजोडया गावच्या शिवारातून बगाडासाठी सोनेश्‍वर येथे दोन दिवस आधीच नेण्यात आल्या होत्या.

दरवर्षी बगाडाचे साहित्य नवीन आणण्याचे नियोजन येथील उत्सव समिती करत असते. ऐनवेळी बगाड ओढताना त्यात काही बिघाड अथवा मोडतोड झाल्यास तात्काळ पर्यायी व्यवस्था करण्यासाठी बगाडाचे डबल साहित्य आणण्यात येते. यावर्षी महसूल खात्याने कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी 144 कलम लागू होताच आणि वाढलेल्या पोलीस बंदोबस्ताला गुंगारा देण्यासाठी बावधन गावच्या भाविकांनी जुने बगाड हे गावातच ठेवून त्याला कसलाही हात न लावता पोलीस प्रशासनाला खात्री वाटावी म्हणून त्याचा या वर्षी वापरच न केल्याने महसूल व पोलीस प्रशासन वापर न केलेल्या बगाडाकडेच बघून यंदा बगाड हे निघणारच नाही अशी खुनगाठ या दोन्ही प्रशासनाने आपापल्या मनाशी बांधली होती. पण बावधनकर बाकी अतिशय धुर्त विचाराने वागून त्यांनी अवघ्या पंधरा दिवसात नवीन बगाडाची यंत्रणा उभी करून तो सोनेश्‍वर येथे विधिवत पुजा करून दि. 2 च्या पहाटे 6.30 वाजण्याच्या सुमारास कौल मिळालेल्या बगाडयाला बगाडावर चढवून त्या ठिकाणी रिवाजाप्रमाणे पाच फेर्‍या काढण्यात आल्या.

यावेळी महसूल व पोलीस दल उघडया डोळयांनी पहात होते. हे बगाड सकाळी शिस्तीने निघून कुठलाही अनुचित प्रकार न घडता अंदाजे शेकडो बैलांच्या जोडया लावून हाकत सकाळी 9 च्या सुमारस वाई-सातारा रस्त्यावर नेत असताना त्यावेळी जिल्हा पोलीस दलातील अतिरिक्त पोलीस अधिक्षक धिरज पाटील यांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने वाई-सातारा रस्त्यावर बगाड आल्यानंतर ग्रामस्थांशी चर्चा केली. कोरोना रोगाचे दुश्परीणाम भयंकर होतात. याची जाणीव ठेवणे गरजेचे आहे.

पोलीस यंत्रणा फेल…

गेली चार दिवस बावधन गावात पोलीस प्रशासन तळ ठोकून होते. अतिरिक्त सुरक्षा दलाच्या तुकडयाही तैनात करण्यात आल्या होत्या. ग्रामस्थांच्या सर्व हालचालींवर पोलीसांची बारीक नजर होती. असे असतानाही बगाडया ठरला जातो. त्याच्या नावाची कमालीची गुप्तता पाळली जाते. शेवटपर्यंत बगाडया कोण हे पोलीसांना समजून दिले जात नाही. गावातील पारंपारीक बगाडाचा रथ गावातच ठेवून नवीन बगाड रथ तयार करण्यात येतो. रात्रीत गावातील व शिवारातील बैल सोनेश्‍वर येथे नेहले जातात व एवढे मोठे बगाड पोलीस व महसूल कर्मचार्‍यांच्या साक्षीने काढण्यात यामुळे. यामुळे पोलीस व महसूल प्रशासन यांचा बेजाबदार कारभार पुन्हा एकदा चव्हाटयावर आलेला दिसून येत आहे.

आपण आपली परंपरा जपली परंतू येथे येणार्‍या भाविकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम भोगायला लागू शकतात. याचे भान बावधनकर कसे विसरले असे सुनावले. तात्काळ बगाड गावात पोहचवीण्याचे आदेश दिले. दरवर्षी हे बगाड सकाळी 7 वाजता लाखो भाविकांच्या दर्शनासाठी सज्ज ठेवून शेताशेतातून वाटचाल करीत असते. त्यावेळी त्याला गावात पोहचायला सायंकाळचे 5 वाजतात. यावेळी मात्र अवघ्या तीन तासात हे बगाड जाग्यावर पोहोच होवून बगाडयाची विधीवत पुजा करून या बगाडयाने केलेला नवस फेडण्याचा त्याच्या कुटुंबाने आनंद घेतला. दि. 1 रोजी मध्यरात्रीच्या दरम्यान मंदिरातून पालखी दर्शनासाठी बाहेर काढण्यात आली होती.

परवानगी नसताना देखील विना परवाना बगाड काढून कोरोना सारख्या रोगाला पसरण्यासाठी एक प्रकारे बावधनकरांनी मदतच केली. असा विश्‍वास महसूल व पोलीस दलाने मनाशी बाळगून यांनी जवळपास गावातील 100 ते 120 भाविकांवर वाईचे तहसिलदार रणजीत भोसले, ग्रामसेवक शिवाजी दरेकर, गावकामगार तलाठी यांनी पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. दाखल झालेले गुन्हे नाथांचा प्रसाद म्हणून गावकर्‍यांनी आनंदाने स्विकारले. 144 कलम असतानाही ग्रामस्थांनी बगाड काढल्याने पोलीसांची नाचक्की झाली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.