पुणे – महाराष्ट्रीय मंडळातर्फे धनंजय दामले स्मृती जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा येत्या शनिवारपासून सुरू होत असून सोमवारी अंतिम सामना होणार आहे.
पुणे जिल्हा बॅडमिंटन संघटनेच्या मान्यतेने होत असलेली ही स्पर्धा महाराष्ट्रीय मंडळाच्या केळकर भोपटकर सभागृहातील बॅडमिंटन संकुलात कोविडबाबतच्या नियमांचे पालन करून खेळवली जाणार आहे.
ही स्पर्धा 13, 15, 17 वर्षांखालील मुले व मुली गटात एकेरी व दुहेरी विभागात होणार आहे. स्पर्धेत आतापर्यंत तब्बल दोनशेपेक्षा जास्त खेळाडूंनी आपला सहभाग निश्चित केला आहे, अशी माहिती स्पर्धा संयोजन समितीचे सदस्य अनिरुद्ध जोशी यांनी दिली आहे.