कुमारांच्या बॅडमिंटन स्पर्धेत श्रेया भोसलेचे दुहेरी यश

पुणे – श्रेया भोसलेने 15 व 17 वर्षाखालील गटात विजेतेपद मिळविले आणि कुमारांच्या खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत दुहेरी कामगिरी केली.भोसलेने 17 वर्षाखालील गटाच्या अंतिम सामन्यात नेहा प्रभुणेचा 15-12, 15-9 असा सरळ दोन गेम्समध्ये पराभव करताना स्मॅशिंगच्या जोरकस फटक्‍यांचा सुरेख खेळ केला. तिने 15 वर्षाखालील गटात रिया सेठविरुद्धचा अंतिम सामना सहज जिंकला.

ड्रॉपशॉट्‌सचा बहारदार खेळ करीत तिने 15-9, 15-6 असा विजय मिळविला. 13 वर्षाखालील गटात अग्रमानांकित रिधिमा सेहरावत विजेती ठरली. तिने अंतिम लढतीत मृणाल सोनारचा 15-12, 15-10 असा पराभव केला. 11 वर्षाखालील गटाचे विजेतेपदाचा मान दक्षयानी पाटीलला मिळाला. तिने श्रेनाक्षी मंडलवर 15-9, 15-8 अशी मात केली. मुलांच्या 17 वर्षाखालील गटात प्रथमेश कुलकर्णीला अजिंक्‍यपद मिळाले. अंतिम सामन्यात त्याने यश राऊतला 15-10, 15-3 असे हरविले. यशराज कदमने आद्य पारसनीसवर 15-10, 15-7 असा सफाईदार विजय मिळवित 15 वर्षाखालील गटाचे अजिंक्‍यपद घेतले.

मुलांच्या 13 वर्षाखालील गटात वेदांत नातू विजेतेपदाचा मानकरी ठरला. त्याला आदित्य त्रिपाठीविरुद्ध अंतिम सामना जिंकताना झगडावे लागले. त्याने हा सामना 14-15, 15-13, 15-13 असा घेतला. 11 वर्षाखालील गटात राजस पिंगळेने अजिंक्‍यपदावर मोहोर नोंदविली. बक्षिस समारंभ क्रीडा संघटक मंगेश काशिकर व विश्‍वास देसवंडीकर यांच्या हस्ते झाला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.