बॅडमिंटन, नेमबाजीमुळे सुगी

भारतीय क्रीडा क्षेत्र म्हणजे केवळ क्रिकेट असेच पूर्वी समीकरण होते. प्रायोजक तसेच विविध लाभ, सवलती आणि क्रीडा चाहत्यांचा अलोट पाठिंबा देखील केवळ क्रिकेटलाच मिळत होता. मात्र, गेल्या दोन दशकांपासून या परिस्थितीत हळूहळू का होईना पण बदल होत गेले व आज क्रिकेटच्या बरोबरीने बॅडमिंटन आणि नेमबाजीसह इतरही खेळ आणि त्यातील खेळाडू यशस्वी होताना दिसत आहेत.

साईना नेहवाल, पी. व्ही. सिंधू, राजवर्धनसिंह राठोड यांनी खरेतर देशात बॅडमिंटन तसेच ऑलिम्पिक क्रीडा प्रकारांना सुगीचे दिवस आणले. महान खेळाडू प्रकाश पदुकोन आणि पी. गोपीचंद यांनी ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा जिंकली तेव्हा देशात बॅडमिंटन संस्कृती वाढीला लागली असे म्हणता येईल. याच खेळाडूंकडून प्रेरणा घेत साईनासारख्या मुलींनी या खेळात रस घेतला आणि त्यात जागतिक कीर्ती देखील मिळविली. जागतिक क्रमवारीत कोणी भारतीय खेळाडू अग्रस्थानी आहे असे चित्र कधी पाहायला मिळेल असे वाटत नव्हते ते साईनाने प्रत्यक्षात करून दाखविले. 2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये तिने ब्रॉंझ पदक जिंकले आणि देशाचा या खेळातील ऑलिम्पिक पदकाचा दुष्काळ संपविला. तिच्याच पावलावर पाऊल ठेवत सिंधूने या क्षेत्रात प्रवेश केला व आपल्याच आदर्शाला मागे टाकत स्वतःचे संस्थान निर्माण केले. ऑलिम्पिक पदक जिंकत सिंधूने भारतीय खेळाडू देखील सातत्याने ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनचे पदक जिंकू शकतात हे दाखवून दिले. 2016 च्या ब्राझील ऑलिम्पिकमध्ये सिंधूने रौप्य पदक मिळविताना जपान, चीन, कोरिया आणि इंडोनेशिया यांचे जागतिक स्तरावरील वर्चस्व नेस्तनाबूत केले.
स्पर्धांचे माहेरघर
जागतिक क्रीडा क्षेत्रात विशेषत: आशिया खंडात विविध खेळांच्या स्पर्धा यापूर्वी भारतात जास्त प्रमाणात आयोजित केल्या जात नव्हत्या. प्रायोजकांची कमतरता, सुविधांचा अभाव ही व अशी अनेक कारणे होती. 2004 नंतर परिस्थिती बदलली आणि क्रीडा स्पर्धांचे माहेरघर म्हणून भारताकडे पाहिले जाऊ लागले. देशाची लोकसंख्या हीच देशाची ताकद बनली व जगातील सर्वांत मोठे मार्केट म्हणून विविध कंपन्या भारतात स्थानिक स्टार खेळाडूंना करारबद्ध करत आपली उत्पादने बाजारात आणू लागल्या. एशियाड, राष्ट्रकूल, सेनादल जागतिक स्पर्धा, हॉकी, कुमार फुटबॉल, तसेच बॅडमिंटन, हॉकी, कबड्डी आणि टेनिस यांच्या लीग अशा कितीतरी स्पर्धा देशात आता सातत्याने आयोजित होत आहेत. केवळ आयोजित होत आहेत नव्हे तर त्याला प्रचंड प्रतिसाद देखील मिळत आहे. रात्री जागून किंवा पहाटे उठून क्रिकेटचे सामने पाहावेत तसेच इतर खेळातील सामने देखील पाहिले जाऊ लागले आणि देशात खऱ्या अर्थाने क्रीडा प्रकारांना तळागाळापर्यंत लोकप्रियता मिळू लागली. यातूनच मोठ्या शहरांतीलच नव्हे तर खेडोपाड्यातूंन देखील अनेक गुणवान खेळाडू पुढे आले व आज हेच खेळाडू देशासाठी सरस कामगिरी करत आहेत.
यशामुळे सुविधा, सुविधांमुळे यश
भारतीय क्रीडापटू जसजसे आंतरराष्ट्रीय पातळीवर यशस्वी होऊ लागले तसे देशात देखील विविध सुविधांची निर्मिती होऊ लागली. चांगली मैदाने, अद्ययावत यंत्रसामग्री, फिजीओ, फिटनेस सल्लागार, परदेशी प्रशिक्षक, स्पर्धांमध्ये सहभागाची जास्तीतजास्त संधी हे सगळे जमून येऊ लागले. पूर्वी क्रिकेटची मैदाने देखील खडीचा राडारोडा वाटत होती, मात्र संघाच्या सातत्यपूर्ण यशामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे पैसा आला आणि जागतिक दर्जाच्या सुविधा देखील तयार झाल्या. याच पद्धतीने इतर खेळांसाठी देखील परिस्थिती बदलली. सरकारी पातळीवर क्रीडा क्षेत्राकडे गांभीर्याने पाहिले जाऊ लागले व लोकाश्रयाबरोबरच राजाश्रय देखील मिळू लागला. आज बॅडमिंटन, कुस्ती, ऍथलेटिक्‍स, नेमबाजी, टेनिस, तिरंदाजी, बॉक्‍सिंग या व अशा अनेक खेळांसाठी सुसज्ज सुविधा तयार आहेत. देशात प्रत्येक शहरात क्रीडा संकुले उभी आहेत. याच सुविधांच्या जोरावर खेळाडू घडतात व त्यांच्याकडून प्रेरणा घेत नवनवीन पिढी देखील क्रीडा क्षेत्रात योगदान देण्यासाठी सज्ज राहते.
माध्यमांचेही प्रोत्साहन
क्रिकेट म्हणजे “राजा हुकला तो संपला’ असे मानत “क्रिकेट एके क्रिकेट’ असा जप करणारी प्रसारमाध्यमे सतत टीकेचे धनी बनली होती. मात्र, आता क्रिकेट वगळता अन्य खेळांना देखील प्रसिद्धी देण्यासाठी माध्यमे तत्पर असतात. खेळाडूंची कामगिरीच केवळ चांगली होऊन चालत नाही तर ती लोकांपर्यंत पोहोचली पण पाहिजे त्यामुळे खेळ कोणताही असो त्याचा प्रसार करण्याचे काम माध्यमांचे असते आणि त्यातूनच खेळाडूंना प्रोत्साहन मिळते. क्रिकेट वगळता देशातील अन्य क्रीडा संघटना हौशी प्रकारात होत्या, व्यावसायिकता नव्हती, त्यामुळे आपल्याच संघटनेची कार्ये, खेळाडूंची कामगिरी याबाबत माध्यमांकडे माहिती देण्याची सजगता नव्हती. आता काळ बदलला, सोशल मीडियाची ताकद समजली आणि मुख्य म्हणजे दुसरा कोणी तुमच्या मुलाचे लाड करणार नाही तर ते तुम्हालाच पुरवावे लागणार आहेत हे समजले. त्यामुळे आता क्रीडा व्यवस्थापनात देखील व्यावसायिकता आली आणि माध्यमांचे महत्त्व आणि ताकद लक्षात आली. आज जर क्रिकेटमधील एखादा अविस्मरणीय विजय किंवा कामगिरी ज्या तडफेने लोकांपर्यंत माध्यमांद्वारे पोहोचते, तिच तत्परता अन्य खेळांच्याबाबत देखील दिसून येते. विराट कोहलीच्या शतकी कामगिरीला पहिल्या पानावर किंवा मुख्य बातमीत स्थान मिळते तर सिंधूच्या यशाचे देखील तितक्‍याच महत्त्वाने कौतुकही होते. पॉलिटीक्‍स, क्राईम, कोर्ट, कार्पोरेशन, कल्चर आणि एंटरटेनमेंट या बीटमधील बातम्यांना जसे पहिल्या पानावर स्थान मिळते तसेच आता क्रिकेटच्या बरोबरीने इतर खेळांतील कामगिरीला देखील प्राधान्य दिले जात आहे. जगातील सर्वांत युवा पिढी भारतात आहे त्यामुळे त्यातून नवनवीन खेळाडू गवसतील. माध्यमांचा दृष्टिकोन बदलत आहे. हा चांगला बदल आहे आणि येणारा काळ देशाला जागतिक क्रीडा क्षेत्रातील महासत्ता बनविणारा असणार यात शंका नाही. (क्रमश:)

सर्वांत श्रीमंत खेळाडू
क्रिकेटपटूला जेव्हा यश मिळते तेव्हा त्याच्या मागे प्रायोजकांची रांग लागते, त्याच्याकडे पैसा येतो मात्र, इतर क्रीडापटूंकडे दुर्लक्ष होते, असे म्हटले जात होते मात्र सिंधूने हे सिद्धांत खोटे ठरविले. आज भारतीय क्रीडा क्षेत्रात सर्वांत श्रीमंत महिला खेळाडू म्हणून सिंधू जागतिक पातळीवर एक आदर्श ठरत आहे. पद्मश्री, अर्जुन आणि सर्वांत प्रतिष्ठेचा खेलरत्न पुरस्कार मिळणारी सिंधू आज देशाचा सर्वांत यशस्वी ब्रॅंड बनली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याच्यानंतर सर्वाधिक जाहिरातींचे करार आज सिंधूकडे आहेत. जाहिरातींच्या चित्रीकरणाच्या तसेच प्रमोशनच्या प्रत्येक दिवसाची तिची कमाई एक लाख ते दीड लाख डॉलर्स इतकी प्रचंड आहे. ब्रीजस्टेन टायर्स, गॅटरोड, मुव्ह, मंत्रा, फ्लीपकार्ट, नोकिया, पॅनासॉनिक, स्टेफ्री, बुस्ट, हिमालया, ओजस्विता आणि बॅंक ऑफ बडोदा अशा अनेक कंपन्यांशी तिचा करार आहे. इतके दिवस हे सगळे प्रायोजक क्रिकेटपटूंच्या मागे मागे फिरत होते आज इतर खेळांसाठी देखील पाठबळ देताना दिसतात हे साईना किंवा सिंधू यांच्या कामगिरीचेच यश आहे.
राठोडची कमाल
2004 सालच्या अथेन्स ऑलिम्पिकमध्ये डबल ट्रॅप नेमबाजी प्रकारात रौप्य पदक पटकावल्यानंतर देशात राजवर्धनसिंग राठोड याची कीर्ती एका रात्रीत पसरली. ऑलिम्पिक पदक ते देखील नेमबाजीत आणि एका भारतीय खेळाडूकडून मिळाले यावर विश्‍वासच बसत नव्हता. या आधी राष्ट्रकूल, आशियाई अशा अनेक आंतरराष्ट्रीय स्तरांवर त्याने पदके मिळविली आहेत. मात्र, ऑलिम्पिकचे पदक हा देशासाठी तसेच क्रिकेट वगळता अन्य खेळांकडे जनसामान्यांचे लक्ष वेधून घेण्याच्या दृष्टीने खूप मोठी कलाटणी देणारा क्षण होता. गगन नारंग, सुमा शिरुर, तेजस्विनी सावंत अशा अनेक खेळाडूंसाठी राठोड यांची कामगिरी प्रेरणादायी ठरली, यातूनच देशात क्रीडा संस्कृतीचा पाया रुजण्यास प्रारंभ झाला.

अमित डोंगरे

क्रीडा क्षेत्रातील आर्थिकता, स्थैर्य आणि बदल
भाग-2

Leave A Reply

Your email address will not be published.