बाली – भारताची दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती स्टार महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने येथे सुरू झालेल्या इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली. सिंधूने पहिल्या फेरीत जबरदस्त लढत देत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
तिने जपानच्या ओहोरीचा तब्बल 1 तास 10 मिनिटे चाललेल्या सामन्यात 17-21, 21-17, 21-17 असा पराभव केला. सिंधूने या लढतीत पहिली गेम गमावली होती. मात्र, दुसऱ्या आणि तिसऱ्या गेममध्ये तिने ओहोरीला नमवले.
ओहोरीनेही सहजगत्या पराभव मान्य केला नाही तर तिने या दोन्ही गेममध्ये सिंधूला जबरदस्त लढत दिली. खरेतर आजवर या दोघींमध्ये झालेल्या लढतीत सिंधूनेच सातत्याने वर्चस्व राखले आहे.
आता या सामन्यातील विजयासह सिंधूने ओहोरीविरुद्ध खेळलेल्या 11 सामन्यांत विजय मिळवले आहेत. याच स्पर्धेच्या गेल्या आठवड्यात झालेल्या पहिल्या सत्रात सिंधूला जपानच्या अकाने यामागुचीकडून पराभव स्वीकारावा लागला होता. या सिरीजच्या पुढील स्पर्धेत मात्र तिने संपूर्ण वर्चस्व राखले.