Badlapur School – महाराष्ट्रातील बदलापूरमधील लैंगिक अत्याचाराच्या घटनेविषयी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी उद्विग्न प्रतिक्रिया दिली. गुन्हा दाखल करण्यासाठीही आंदोलन करावे लागणार का? पीडितांसाठी पोलीस ठाण्यापर्यंतही पोहचणे एवढे अवघड का बनले आहे, असे सवाल त्यांनी विचारले.
पश्चिम बंगाल, उत्तरप्रदेश आणि बिहारनंतर महाराष्ट्रात बालिकांविरोधात घृणास्पद गुन्हे घडले. ते एक समाज म्हणून आपण कुठे जात आहोत याचा विचार करण्यास भाग पाडतात. बदलापूरमधील घटनेनंतर जनता रस्त्यांवर उतरेपर्यंत न्यायासाठीचे पहिले पाऊल उचलले गेले नाही.
न्याय देण्यापेक्षा अधिक प्रयत्न गुन्हा दडवण्यासाठी झाल्यास महिला आणि दुर्बल घटकांतील लोक बळी ठरतात. गुन्हा दाखल न होण्याने पीडितांचे मनोधैर्य खचते आणि गुन्हेगारांना प्रोत्साहन मिळते. महिलांसाठी सुरक्षित वातावरण तयार करण्याच्या उद्देशातून कुठली पाऊले उचलली जावीत यावर सर्व सरकारे, नागरिक आणि राजकीय पक्षांनी गांभीर्याने विचार करायला हवा.
न्याय हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. तो पोलीस आणि प्रशासनाच्या मर्जीवर अवलंबून नसावा, अशी भूमिका राहुल यांनी सोशल मीडियावरून मांडली.