बदलापूर : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी नराधम आरोपी अक्षय शिंदेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणात आरोपी अक्षय शिंदे बरोबर शाळेच्या मुख्याध्यापिका, संस्थेचे अध्यक्ष आणि सेक्रेटरी यांनाही कोर्टाने आरोपी ठरवले आहे. सध्या तर फरार आहेत. आता प्रकरणाचा अहवाल समोर आला आहे. यावर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले दीपक केसरकर?
बदलापूर प्रकरणात दोन सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीने आपला चौकशी अहवाल सादर केला आहे. या अहवालावर सविस्तर चर्चा करण्यात आली. शाळेत दोन सेविका होत्या, लहान मुलांना शौचालयात घेऊन जाण्याचं त्या काम करतात, मात्र चौकशी दरम्यान दोन्ही सेविका अनुपस्थित होत्या. जर त्या तिथे उपस्थित असत्या तर हे सगळं प्रकार घडलं नसतं असं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. या प्रकरणात दोन्ही सेविकांना सहआरोपी म्हणून कारवाई व्हावी असंही केसरकर यांनी स्पष्ट केलं आहे.
तसेच मुलींच्या कुटुंबियांची भेट घेणार असून पीडित मुलींच्या शिक्षणाची जबाबादीर मी घेत आहे, तिचं पदवीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी माझी असल्याचंही दीपक केसरकरांनी सांगितलं. अत्याचाराच्या घटनेतील मुलीला 10 लाखाची मदत केली जाईल आणि प्रयत्न झालेला आहे तिला 3 लाख मदत करणार. दोघींच्या शिक्षणाच्या खर्चाची जबाबदारी आम्ही उचलू. त्यासाठी लागणारी आर्थिक मदत दर महिन्याला चेक स्वरुपात देण्यात येईल. मुलीची ओळख उघडकीस होणार नाही याची काळजी घेऊ असंही केसरकर म्हणाले आहेत.
अहवालात काय म्हंटले?
पीडित मुलीच्या आजी-आजोबांनी वर्ग शिक्षकांना हा प्रकार सांगितला होता. इतकंच नाही तर शाळेच्या मुख्याध्यापकांनाही हा प्रकार सांगितला होता. पण शिक्षक किंवा मुख्याध्यापकांनी पोलिसांनी काहीच माहिती दिली नाही. अशी माहिती चौकशी समितीच्या अहवालात समोर आली आहे. त्यामुळे शिक्षिका आणि मुख्याध्यापकांविरोधातही पोक्सोच्या कलम 19 आणि 21 अंतर्गत कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली आहे. यासाठी पोलिसांना पुरावे गोळा करावे लागणार आहेत, अशी माहिती दीपक केसरकर यांनी दिली आहे.
काय आहे बदलापूर प्रकरण ?
बदलापूर पूर्वेतील आदर्श विद्यालय या शाळेमध्ये एका चार वर्षांच्या आणि एका सहा वर्षांच्या मुलीवर शाळेतील शिपायाकडून अत्याचार करण्यात आला. लघुशंकेला घेऊन जाऊन या मुलींवर अत्याचार करण्यात आला. १२ ऑगस्ट रोजी एका मुलीसोबत दुष्कृत्य केले गेले, तर १३ ऑगस्टला आणखी एका दुसऱ्या चिमुरडीवर अत्याचार करण्यात आला.
या मुली शाळेत जायला तयार नसल्याने त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली, त्यानंतर हा गंभीर प्रकार उघडकीस आला.दोन्ही पीडित मुलींच्या कुटुंबीयांनी १६ ऑगस्ट रोजी पोलिस ठाण्यात धाव घेतली. मात्र गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी १२ तासांचा विलंब केल्याचा आरोप कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. या प्रकरणी अक्षय शिंदे नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. यानंतर संतप्त झालेल्या लोकांनी बदलापूर स्थानक बंद ठेवत आंदोलन केले. तसेच आंदोलकांकडून आरोपीला फाशी द्या, नाहीतर आरोपीला आमच्या हवाली करा अशी मागणी करण्यात आली.