ठाणे : बदलापूर येथील अल्पवयीन मुलींवर अत्याचार प्रकरणातील खटल्यासाठी सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील म्हणून नाशिकचे अॅड.अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या विधी व न्याय विभागाने अॅड. मिसर यांची निवड केली आहे. बदलापूर येथील लैगिंक अत्याचार आणि संशयित आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरमुळे हा विषय राज्यात बहुचर्चित आहे.
राजकीय पातळीवर आरोप-प्रत्यारोप होत आहेत. संवेदनशील असलेल्या याप्रकरणात न्यायालयात सरकार पक्षातर्फे बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अॅड. मिसर हे नाशिक जिल्हा न्यायालयात विशेष सरकारी वकील आहेत. आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काउंटरची पाहणी, काही जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत.
तसेच, शिंदेच्या एन्काऊंटरवरून पोलिसांवर टीकाही होत आहे. या प्रकरणात अॅड. मिसर यांना कायदेशीर बाजू मांडावी लागणार आहे. अॅड. मिसर यांची शासनाने यापूर्वीही अनेक संवेदनशील खटल्यांमध्ये सरकार पक्षातर्फे नियुक्ती केली आहे.