अवैध हातभट्टीवर कारवाईचा बडगा

निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर उत्पादन शुल्क विभागाची कामगिरी

तीन लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सक्रिय झालेल्या राज्य उत्पादन शुल्क आचारसंहिता लागू झाल्यापासून मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू केली आहे. विभागाने दिलेल्या माहितीनुसार मावळ विधानसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून एकूण 32 गुन्हे नोंदवले आहेत. या गुन्ह्यांमध्ये तीन मोटरसायकल, 9200 लिटर रसायन, 455 लिटर अवैध हातभट्टी दारु, 4.9 लिटर विदेशी दारु, 33 लिटर देशी दारु व 6.5 लिटर बीयर जप्त केली आहे. या एकूण मुद्देमालाची किंमत 3 लाख 62 हजार 435 रुपये इतकी आहे.

वडगाव मावळ – लोकसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क, तळेगाव दाभाडे विभागाने मावळ विधानसभा मतदारसंघात विविध ठिकाणी कार्यवाही करुन चार गुन्ह्यांची नोंद केली आहे. अवघ्या काही दिवसांवर लोकसभा निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. लोकसभा निवडणुका शांतता आणि पारदर्शक स्थितीत पार पडाव्यात यासाठी मिळालेल्या निर्देशानुसार विभागाने कडक कारवाई सुरू केली आहे.

आचारसंहिता लागू झाल्यापासून विभागाकडून सातत्याने छापासत्र सुरूच आहे. गुरुवारी देखील विभागाने तीन हातभट्टी वाहतूक करणाऱ्या तीन मोटरसायकल जप्त केल्या आहेत. तसेच एका अवैध हातभट्टी बनवणाऱ्या अड्ड्यावर छापा घालून तेथील रसायन व अवैध हातभट्टी दारु जप्त केली आहे. या कारवाईत चार गुन्हे दाखल केले असून तीन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईमध्ये एकूण एक लाख 47 हजार 50 रुपयांचा मुद्दामाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमध्ये निरीक्षक आर.एल.खोत, एन.एन. होलमुखे, दुय्यम निरीक्षक आर.ए.दिवसे, सहाय्यक दुय्यक निरीक्षक ए.बी.राऊत तसेच कर्मचारी राठोड, रणसुरे, भरणे, भताने, जवान व वाहनचालक सहभागी झाले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.