पुणे: द पूना क्लब लिमिटेड आणि बिलियर्डस अँड स्नूूकर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (बीएसएएम) यांच्या संलग्नतेने बीएसएएम सिक्स रेड सकूकर राज्य निवड अजिंक्यपद 2019 स्पर्धेत माजी राज्यस्तरीय स्पर्धेतील स्नूूकर विजेता हसन बदामी, मानव पांचाळ, शिवम अरोरा, माजी वरिष्ठ राज्यातील अव्वल मानांकित खेळाडू शाहबाज खान या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
पूना क्लब येथील बिलियर्डस हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत अव्वल मानांकित मुंबईच्या हसन बदामीने पुण्याच्या अभिषेक बोराचा 5-2 असा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली. पुण्याच्या शिवम अरोरा याने आपली विजयी घोडदौड कायम ठेवत आपला शहर सहकारी माधव जोशी याचा 5-0 असा एकतर्फी पराभव केला. उपांत्य फेरीत शिवम अरोरा समोर अव्वल मानांकित हसन बदामीचे आव्हान असणार आहे.
दुसऱ्या मानांकित मुंबईच्या
मानव पांचाळने संकेत मुथाला 5-1 असे पराभूत करून उपांत्य फेरी गाठली. मुंबईच्या शाहबाज खानने पुण्याच्या तहा खानचे आव्हान 5-2 असे मोडीत काढत उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत शाहबाज खानचा सामना दुसऱ्या मानांकित मानव पांचाळ याच्याशी असणार आहे.