दूषित पाणी पिण्यामुळे होणारे आजार

वयाप्रमाणे जलसंजीवनी किती द्यावी?

एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी शौचास होणे याला अतिसार म्हणतात. त्यामुळे शरीरातील पाणी कमी होते व त्यामुळे त्वचा कोरडी पडते. यावर वेळीच उपचार केले नाहीत तर मृत्यूही येऊ शकतो.
लक्षणे – एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ जुलाब, जास्त तहान लागणे, डोळे खोल जाणे. जीभ व तोंड कोरडे पडणे. अर्भकामध्ये टाळू खोल जाणे. लघवी थोडी गडद रंगाची होणे किंवा लघवी न होणे. गुंगल्यासारखे किंवा चिडखोर होणे. कातडीस चिमटा काढल्यास अतिशय हळूहळू पूर्ववत होणे.

अतिसारावर उपाय व पथ्य
अतिसार झालेल्या व्यक्तीस रोजच्यापेक्षा जास्त पातळ पदार्थ द्यावे. उदा. तांदळाची पेज, सरबत, लस्सी, फिका चहा. दिवसातून पाच पेक्षा जास्त वेळा पचनास हलके अन्न द्यावे. जलसंजीवनी द्यावी.

वयाप्रमाणे जलसंजीवनी किती द्यावी?
तीन महिने – 1/2 लिटर
सहा महिने ते एक वर्ष – 1/2 लिटर
एक वर्ष ते पाच वर्ष – 3/4 लिटर
दोन वर्ष ते पाच वर्ष – 1 लिटर
पाच वर्ष ते पंधरा – 2 लिटर
पंधरा वर्षाचे वर – 2 ते 3 लिटर

जुलाब – मनुष्य निरोगी असताना मळाचा घट्टपणा ठरावीक असतो. तसेच मलविसर्जन दिवसातून बहुधा एकाच वेळेस होते. मात्र, काही आजारांत मळाचा पातळपणा वाढतो. याचे कारण लहान किंवा मोठ्या आतड्यात असू शकते. काही वेळा पाण्यासारखे जुलाब होतात. दिवसातून एकापेक्षा अधिक वेळा जावे लागते. काही आजारात रक्त व चिकट पदार्थही काही वेळा पडतात. शौचाला अर्धवट झाल्यासारखे वाटते. या सर्वांना जुलाब असे सामान्य नाव असले तरी त्यात प्रकार आहेत. लहान आतड्यात आजार असेल तर त्यातले अन्न व पाणी शोषले न जाता बहुतेक सर्व अन्नपाणी तसेच बाहेर पडते. त्यामुळे पातळ, पाण्यासारखे जुलाब होतात. कित्येक वेळा पोटात अन्न नसले तरी लहान आतड्यात पाणी, रस पाझरून त्याचेच जुलाब होतात. पातळ जुलाबांबरोबर काही वेळा कळ येते तर काही वेळा येत नाही. पटकी व अतिसारामध्ये हे जुलाब भाताच्या पेजेसारखे पांढरे येतात. पातळ जुलाबामध्ये रक्त सहसा पडत नाही. पटकीत व तसल्याच काही आजारांत जुलाब व उलट्या एकत्रच होतात. पण बहुधा उलटी आधी होते व मग जुलाब चालू होतात.

आव – आजार जर मोठ्या आतड्यात असेल तर जुलाब फार पातळ होत नाहीत. यात बहुधा चिकट पदार्थ (व कधीकधी रक्त) पडते. बहुतेक वेळा पोटात कळ येते किंवा दुखत राहते. या प्रकाराला आमांश (आव) म्हणण्याची पध्दत आहे. हगवण हा शब्द दोन्ही प्रकारांच्या (लहान व मोठ्या आतड्यांच्या) आजाराला वापरतात. आवेत पडणारे रक्त आतड्याला जखमा झाल्याने पडते. या जखमा जंतूंच्या आक्रमणामुळे होतात. सर्वच प्रकारचे जंतू आतड्याला इजा करत नाहीत. शौचाला पातळ होणे हे लहानपणापासून सर्वांच्या अनुभवाचे असते. मात्र, यात खालीलप्रमाणे काही प्रकार असतात.
पाण्यासारखे पातळ जुलाब असल्यास अतिसार म्हणतात. मळाला नुसता पातळपणा असेल तर हगवण म्हणतात. परंतु लोकभाषेत असा स्पष्ट फरक दिसून येत नाही. आव हगवण (आमांश) दोन प्रकारची असते. रक्तशेंब असणारी व नुसती शेंब पडणारी.

हगवण हा शब्द दोन्ही प्रकारांना (लहान व मोठ्या आतड्याचा आजार) वापरतात. जुलाबात पडणारे रक्त मोठ्या आतड्यात जखमा झाल्याने पडते. या जखमा जंतूंच्या आक्रमणामुळे होतात. सर्वच प्रकारचे जंतू आतड्याला इजा करत नसल्यामुळे नेहमी रक्त पडत नाही. आजार लहान आतड्यात असेल तर त्यातले अन्न व पाणी शोषले न जाता बहुतेक सर्व अन्न-पाणी तसेच बाहेर पडते. त्यामुळे पातळ, पाण्यासारखे जुलाब होतात. पोटात अन्न नसले तरी लहान आतड्यात पाणी, रस पाझरून त्याचेच जुलाब होतात.

पातळ जुलाबाबरोबर काही वेळा कळ येते तर काही वेळा कळ येत नाही. पटकी व अतिसारामध्ये हे जुलाब भाताच्या पेजेसारखे पांढरे असतात. पातळ जुलाबामध्ये सहसा रक्त पडत नाही. पटकी व अशा काही आजारांत जुलाब व उलट्या एकत्रच होतात. पण बहुधा उलटी आधी येते व मग जुलाब चालू होतात. आजार जर मोठ्या आतड्यात असेल तर जुलाब फार पातळ होत नाहीत. यात बहुधा चिकट पदार्थ (शेंब) व कधीकधी रक्त पडते. बहुतेक वेळा पोटात कळ येते आणि दुखत राहते. या प्रकाराला आमांश (आव) म्हणण्याचीही पध्दत आहे.

गॅस्ट्रो – दूषित पाण्यामुळे उलटी व जुलाब यासारखे आजार होऊ शकतात. यामुळे शरीर कोरडे पडू शकते. शरीर कोरडे पडणे म्हणजेच गॅस्ट्रो. दूषित पाण्यामुळे या रोगाचा फैलाव फार मोठ्या प्रमाणत होतो. उदा. एकाच ओढ्याचा कपडे धुणे, आंघोळ करणे, जनावरांना धुणे इ. साठी वापर केला तर, त्याचप्रमाणे उघड्यावरचे अन्न खाल्ल्याने, पाणी न गाळता, न उकळता, तसेच न झाकलेले पाणी पिणे म्हणजेच स्वच्छतेचा अभाव, असल्यामुळे गॅस्ट्रोची लागण व प्रसार होतो.

लक्षणे – पोट दुखणे व वारंवार पातळ संडास होणे. उलटी होणे. लहान मुलांची टाळू खोल जाने, डोळे खोल जाणे. तोंड कोरडे पडणे वजनात घट होणे. लघवी कमी होणे किंवा लघवीचा रंग बदलणे.
उपाययोजना – पाणी उकळून व गाळून पिणे. घराच्या परिसरातील स्वच्छता राखणे. शौचाला जावून आल्यानंतर हात साबणाने धुणे. जलसंजीवनी देणे. याने फरक न पडल्यास दवाखान्यात दाखवावे.

इतर उपाय योजना – गावातील पाणीपुरवठा योजनेची नियमित पाहणी करणे. गावातील मुख्य टाकी नियमित धुवून स्वच्छ करणे. मुख्य पाईपलाईन ते टाकीपर्यंत पाईपलाईन मध्ये गळती आहे का ते पाहणे. टाकीवर नेहमी झाकण आहे का ते पहावे. पाण्याच्या टाकीचा परिसर स्वच्छ असावा. शक्‍यतो हातपंपाचे पाणी, पायऱ्या नसणाऱ्या विहिरीचे पाणी पिण्यासाठी वापरावे किंवा सार्वजनिक विहिरीत टी.सी.एल. टाकून ते पाणी पिण्यासाठी वापरावे; परंतु तिथे दररोज घाण होणार नाही याची काळजी घ्यावी.

कावीळ – दूषित पाणी तसेच अन्नपदार्थामधून पसरणारी कावीळ वर्षभर असते. मात्र, पावसाळ्यात या संसर्गजन्य आजारात वाढ होते. परंतु स्वच्छतेच्या काही सवयी लावून घेतल्या तर काविळीपासून दूर राहता येते. कावीळ हा विषाणूजन्य आजार आहे. या आजाराचा प्रसार दूषित पाणी, दूषित अन्न, वैयक्तिक अस्वच्छता अशा विविध कारणांमुळे होतो. डोळे, लघवी, नखे पिवळी दिसतात. कावीळ ही दूषित सुया कावीळ झालेल्या माणसाचे रक्त यातूनही कावीळ पसरू शकते. काविळीची लागण झाली की यकृतामध्ये बिघाड होतो. शरीरात पित्तनलिकेत काही अडथळा असला तर कावीळ होते.
लक्षणे – सुरुवातीला थोडा ताप येतो. भूक कमी होते. मळमळ व उलट्या होतात. लघवी गडद पिवळी होऊ लागते. डोळे पिवळे दिसू लागतात. बऱ्याच वेळा पोटाच्या वरच्या भागात दुखते. काही जणांच्या अंगाला खाज सुटते.

प्रतिबंधात्मक उपाय – गरोदर स्त्रियांना हा आजार झाल्यास त्यांना गंभीर प्रकारांना सामोरे जावे लागते. हा आजार होऊ नये यासाठी गरोदर स्त्रिया तसेच इतरांनीही काही सूचनांचे काटेकोर पालन करावे. पिण्यासाठी स्वच्छ पाण्याचा वापर करावा. पाणी 15 मिनिटे उकळून प्यावे. बाहेरच्या ठिकाणी पाणी पिताना काळजी घ्यावी

घरी तयार केलेले ताजे पदार्थच खावेत. उघड्यावरील, माशा बसलेले पदार्थ टाळावेत. रस्त्यावरील उघडे खाद्यपदार्थ- कापलेली फळे, शीतपेय, पाणीपुरी, भेळ हे सर्व बनवताना स्वच्छ पाण्याचा वापर केला नसल्यास तसेच वैयक्तिक स्वच्छता ठेवली नसल्यास या पदार्थांमधून काविळीचे विषाणू पसरू शकतात. विशेषतः गरोदर स्त्रियांना हे पदार्थ आवडत असल्यास ते खाण्याची तीव्र इच्छा होते. मात्र रस्त्यावर विक्रीसाठी ठेवलेले पदार्थ कटाक्षाने टाळावेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.