बॅकलॉग, श्रेणीसुधार परीक्षा होणार संपूर्ण अभ्यासक्रमावर

पुणे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाची माहिती

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्ग वगळता अन्य वर्षाच्या बॅकलॉग आणि श्रेणीसुधार परीक्षा शंभर टक्के अभ्यासक्रमावर होणार आहेत. त्यावर विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले जातील, असे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने स्पष्ट केले आहे.

 

पुणे विद्यापीठातर्फे अंतिम पूर्व वर्षांची बॅकलॉग व श्रेणीसुधार परीक्षा डिसेंबर महिन्यात होत आहे. यात 3 ते 6 डिसेंबर या काळात सराव परीक्षा होईल. दि. 8 ते 23 डिसेंबर या कालावधीमध्ये मुख्य परीक्षा होणार आहे. ऑक्टोबर महिन्यात घेण्यात आलेल्या अंतिम वर्षाच्या परीक्षेत विद्यापीठाने मार्च 2020 पर्यंत शिकवलेल्या अभ्यासक्रमावर परीक्षा घेतली होती.

 

त्यासाठी 100 टक्के अभ्यासक्रम नव्हता. त्या पार्श्वभूमीवर बॅकलॉगच्या परीक्षेसंदर्भात विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने अभ्यासक्रम निश्चित केला आहे. चार विद्याशाखेच्या अधिष्ठातांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोणत्या कोर्ससाठी किती अभ्यासक्रम असेल हे परीक्षा विभागाने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

 

कला, वाणिज्य, विज्ञान, शारीरिक शिक्षण, शिक्षण या अव्यावसायिकच्या परीक्षेसाठी शंभर टक्के अभ्यासक्रमावर प्रश्न विचारले जातील. आर्किटेक्चरच्या ऑड सेमिस्टरसाठी शंभर टक्के तर ईव्हन सेमिस्टर परीक्षेसाठी 80 टक्के अभ्यासक्रम असेल. अभियांत्रिकीच्या 2019 पॅटर्नची परीक्षा प्रत्येक विषयाच्या चार धड्यांवर होणार आहे. तर इतर पॅटर्नची परीक्षा 100 टक्के अभ्यासक्रमावर होईल. व्यवस्थापन, विधी, फार्मसीची परीक्षा शंभर टक्के अभ्यासक्रमावर होणार असल्याचे विद्यापीठाने सांगितले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.