पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने बॅकलॉग परीक्षेत गोंधळ होता कामा नये, यासाठी प्राध्यापकांना प्रश्नसंच योग्य पद्धतीने तयार करण्यासाठी प्रशिक्षण दिले आहे. त्यात प्रश्नसंच तयार करताना ते एक्सेल शीटमध्ये कसे भरावेत, आकृती-फॉर्मुले यांची रचना कशी करावी, हा संच गोपनीय पद्धतीने ऑनलाइन कसा सबमीट करावा याचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यामुळे बॅकलॉग परीक्षा विनाअडथळा पार पडणार असल्याचे दिसून येत आहे.
विद्यापीठातर्फे अंतिम वर्षाची परीक्षा नोव्हेंबरमध्ये घेण्यात आली. त्यात प्राध्यापकांना प्रश्नसंच करताना पुरेसी माहिती नव्हती. त्यामुळे प्रश्नपत्रिकेत आकृती, योग्य फॉन्ट नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागले. या चुका टाळण्यासाठी विद्यापीठाने प्राध्यापकांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.
अंतिम वर्षाच्या परीक्षेनंतर डिसेंबरमध्ये बॅकलॉग आणि श्रेणीसुधारसाठी ऑनलाइन परीक्षा घेतली जाणार आहे. त्यासाठी प्रश्नसंच तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यापूर्वी विद्यापीठाने सर्व विषयांचे अभ्यास मंडळाचे अध्यक्ष व सदस्य यांचे विद्याशाखा निहाय प्रशिक्षण घेतले. त्यामध्ये चुका टाळण्यासाठी प्राध्यापकांना सूचना दिल्या आहेत.