परत आपली ओंजळ भरतात…

का सरी जाती बरसून
तुझ्या आठवांसवे…
का उरी येती दाटून कृष्ण मेघांचे थवे…
मन हळवं उदास होऊन जातं
क्षितिजावर कृष्णसावळे
मेघ दाटल्यावर…
स्वतःच क्षितिज बनून जातं
तुझ्या आठवणींचे
ढग ओथंबून आल्यावर…
नेहमी नेहमीच असं का होतं,
पहिल्या पावसाची चाहूल लागल्यावर?
मनाच्या तळाशी वादळ उठतं
पहिली अधीर सर बरसण्याअगोदर…
माझं वेडं मन बेट बनून जातं
तुझ्या आठवांचं तळं साचल्यावर
अन्‌ तळ्यात नावा सोडत राहतं,
तुझी नाव भेटेल या वेड्या आशेवर
म्हणूनच एक मनापासून सांग…
तुझ्या अंगणात असे मेघ उतरल्यावर
तुझ्या डोळ्यातून सरी बरसतात ना?
आठवणींच्या धारा झेलत
तू चिंब भिजल्यावर
त्या अलगद पावसाच्या सरींमधे मिसळतात ना?
अगं म्हणूनच तर मी
अधीर चातक होऊन
पावसाची वाट पहातो
अगं तुझे माझे अश्रू वहात जाऊन
शेवटी समुद्रालाच मिळतात

…अन्‌ पुढच्या वर्षी परत
आपली ओंजळ भरतात…

– हर्षल राजेशिर्के

Leave A Reply

Your email address will not be published.