इंदोर – मध्य रेल्वे तर्फे लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये मसाज सुविधा पुरवण्याचा घेण्यात आलेला निर्णय आज मागे घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेतर्फे काही दिवसांपूर्वी इंदूर येथून सुटणाऱ्या 39 लांब पल्ल्यांच्या एक्सप्रेस गाड्यांमध्ये सकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत डोक्याची आणि पायाची मसाज देण्याची सुविधा जाहीर करण्यात आली होती. मात्र मध्य रेल्वेच्या या निर्णयाला कडाडून विरोध झाल्यानंतर प्रशासनातर्फे सदर निर्णय मागे घेण्यात आला आहे.
या निर्णयाविरोधात माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी थेट रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती तसेच अन्य महिला संघटनांनी देखील धावत्या रेल्वेमध्ये मसाज सेवा नकोच असा पवित्रा घेतला होता. दरम्यान वाढता विरोध लक्षात घेता प्रशासनातर्फे हा निर्णय मागे घेण्यात आला असून त्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.