आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे दरात भडका : अजूनही दर वाढण्याची शक्यता
पिंपरी – अमेरिका आणि इराण दरम्यान निर्माण झालेल्या संभाव्य युद्धजन्य परिस्थितीमुळे सोने-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. अनपेक्षितपणे या सोन्याने उच्चांकी दर गाठल्यामुळे ग्राहकांनी सध्या सोने-चांदी खरेदीकडे पाठ फिरवली आहे. याचा फटका स्थानिक सराफा व्यावसायिकांनाही बसत आहे. परंतु भविष्यात अजूनही दर वाढण्याची शक्यता असल्याने काही गुंतवणूकदार वाढत्या दरातही सोने-चांदी खरेदीला प्राधान्य देत असल्याचे सांगण्यात येत आहे.
सध्या सोन्याचा भाव प्रति तोळा (10 ग्रॅम) 41 हजार 700 रुपये झाला असून, लवकरच 45 हजार रुपयांचा टप्पा पार करेल, असा अंदाज पिंपरी-चिंचवड शहरातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. मागील चार दिवसांतच तब्बल 2 हजार 700 रुपयांनी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. तर चांदीच्या दराचा आलेखही चढताच राहिल्याने सराफ बाजारपेठ मागील काही दिवसांपासून थंड पडली आहे.
गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्यांच्या दरात 29 डॉलरची वाढ झाली आहे. सोने हे सर्वसामान्यांसाठी एक चांगली गुंतवणूक मानली जाते. सोन्याने कधीही आपल्या ग्राहकास निराश केले नाही. विशेषतः भारतात अडी-अडचणीच्या काळात प्रत्येक कुटुंबाच्या मदतीला सोने धावून येते. 2019 मध्ये सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांना खूप चांगले रिटर्न्स मिळाले आहेत. तज्ज्ञांच्या मते यावर्षीही सोन्यातील गुंतवणूक फायद्याची ठरू शकते. येत्या काळात सोने आणि चांदीचे दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
अमेरिकी एयरस्ट्राइकनंतर इराण आणि अमेरिकेत वाढलेल्या तणावामुळे अचानकच सोन्याची झळाळी वाढली. तसेच गेल्या दीड वर्षांमध्ये अमेरिका आणि चीनमध्ये सुरू असलेला “ट्रेड वॉर’ही सोन्याची किंमत वाढविण्यासाठी कारणीभूत ठरला आहे. जागतिक पातळीवर केंद्रीय बॅंकांकडून व्याज दरात केलेली कपात, कमकुवत झालेला डॉलरदेखील सोन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी फायदेशीर ठरला आहे.
फायद्याचा सौदा
सोन्याचे वैशिष्ट्य असे सांगितले जाते की सोन्याचे दर ज्या तुलनेत वाढतात, त्या तुलनेत कधीच घसरत नाहीत. सोने महाग होऊ लागले की तीन ते चार वर्ष तो ट्रेंड तसाच राहतो. यामुळे सोने ही सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. विशेषतः भारतात 2019 मध्ये सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांना सुमारे 24 टक्के इतका प्रचंड रिटर्न मिळाला आहे. जगभरात सोन्याचे रिटर्न 19 टक्के असताना भारतात मात्र गुंतवणूकदारांना चांगला फायदा मिळाला. केंद्रीय बॅंकांद्वारे सोने खरेदी करण्यामुळे देखील सोन्याचे भाव वाढत आहेत.
असे वाढले दर
पिंपरी-चिंचवड शहरातील सराफ व्यावसायिक मुंबई येथील सराफ बाजारानुसार सोन्याचे दर ठरवत असतात. मागील काही दिवसांपासून सराफ बाजारात सोन्याच्या दराने चांगलीच उसळी घेतल्यामुळे सराफ बाजार ओस पडल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात नव्या वर्षांपासूनच सोन्याचे दर वाढायला सुरुवात झाली आहे. 1 जोनवारी रोजी सोन्याचा दर 38 हजार 800 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका होता. तर गुरुवार दि. 2 जानेवारी रोजी यामध्ये वाढ होऊन प्रतितोळा 39 हजार रुपये दर झाला. तर दि. 3 जानेवारी रोजी 39 हजार 500 रुपये दर झाला होता व बाजार बंद होताना हे दर 40 हजार रुपयावर गेले होते. शनिवारी आणि रविवारी सराफ मार्केटला सुट्टी होती. त्यामुळे सोमवार दि. 6 जानेवारी रोजी सराफ बाजार उघडताच सोन्याचे दराने विक्रमी उसळी घेतली. आज सकाळीच सोन्याचे दरामध्ये 1 हजार 700 रुपयांनी वाढ होऊन सोने प्रतितोळा 41 हजार 700 रुपयांवर पोहचले होते.
सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे सध्या सराफ बाजार कमालीचा थंडावला आहे. मागील काही दिवसांपासून भावातील चढउतारामुळे सराफ बाजारातील उलाढाला थंडावली आहे. पुढील महिन्यात लग्नसराईस सुरुवात होत आहे. त्यामुळे, सराफ बाजारात मोठी उलाढाल होईल, अशी अपेक्षा असताना सोन्यातील भाववाढीमुळे सध्या तरी ग्राहकांनी सोने खरेदीकडे पाठ फिरवली आहे.
सध्या अमेरिका आणि इराण या देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे. त्याचा थेट परिणाम जागतिक बाजारपेठेवर झाला आहे. तसेच शेअर मार्केटमध्येही मोठी घसरण सुरू आहे. त्यामुळे, शेअर मार्केटमधील गुंतवणूकदार सोन्यामध्ये गुंतवणूक करीत आहेत. परिणामी सोन्याच्या दारामध्ये विक्रमी वाढ होत आहे. ही स्थिती पुढील काही दिवस अशीच कायम राहण्याची शक्यता आहे. सोन्याचे दरामध्ये वाढ होत असल्यामुळे ग्राहकांनी सध्या तरी सोने खरेदीकडे पाठ फिरवली आहे.
– हरीश वर्मा, दीप ज्वेलर्स, डांगे चौक