प्रसिद्धीपत्रकाद्वारे संयोजकांची माहिती
पुणे – पुण्याच्या नाट्यस्पर्धांच्या वर्तुळात “फिरोदिया करंडक एकांकिका’ स्पर्धा प्रतिष्ठेची समजली जाते. मात्र, यंदा स्पर्धेच्या तोंडावर वेगळ्याच “अंका’ची सुरूवात झाली होती. त्यामुळे आयोजकांनी स्पर्धेत सादर होणारी कथेची प्रत “सेन्सॉर’ने मान्य केल्याशिवाय सादरीकरणास परवानगी न देण्याची भूमिका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केली होती. त्याला विरोध झाल्यानंतर हा नियम मागे घेण्यात आला आहे.
यंदाच्या फिरोदियामध्ये हिंदू-मुस्लिम, भारत-पाकिस्तान, राम मंदिर, कलम 370 आदीबाबतचे विषय आणि जाती-धर्माबाबत भाष्य करणारे संवेदनशील विषय सादर केले जाऊ नयेत, असे सांगत विषय निवडीबाबत संयोजकांकडून नियम घालून देण्यात आले होते. याविरुद्ध सोशल मीडियावर स्पर्धक आणि नाट्य कलाकारांकडून टिपण्णी केली. या टीकेनंतर फिरोदियाच्या आयोजकांकडून विषय निवडीचे नियम मागे घेण्यात आले आहेत.
“नावीन्यपूर्ण विषयांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने या स्पर्धेमध्ये कायम प्रयत्न करण्यात येतो. विद्यार्थ्यांनी कायम नवीन विषय मांडावेत, नवीन विषयांची निवड करावी, यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतो. विषय निवडताना सातत्याने त्याच विषयांची मांडणी कमी व्हावी. मुलांनी जाती-धर्मापलीकडे नावीन्यपूर्ण विचार करावा. संवेदनशील विषय टाळून नावीन्यपूर्ण विषय हाताळावेत, अशी आमची भावना होती. मात्र अनेक ठिकाणी संयोजकांच्या हेतूबाबत शंका व्यक्त करण्यात आली,’ अशी भूमिका फिरोदियाच्या संयोजकांनी शुक्रवारी जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केली आहे. दरम्यान, निवड झालेल्या संहितेमध्ये जातीय किंवा धार्मिक तेढ निर्माण होणार नाही; याची काळजी संबंधित महाविद्यालयाच्या संघांनी घ्यावी, असे फिरोदिया-2020 च्या निवेदनात नमूद केले होते.