अमरावती – विधानसभा निवडणूकीत प्रहार पक्षाचे प्रमुख अचलपूरचे माजी आमदार बच्चू कडू यांचा भाजपचे आमदार प्रवीण तायडे यांनी पराभव केला. त्यानंतर कडूंच्या अडचणी वाढत चालल्याचे दिसत आहे. आधीच त्यांची आमदारकी गेली आहे. त्यात आता अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदावरही गंडांतर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. अशा स्थितीत बच्चू कडू यांच्या पुढील पर्याय काय याची ही चर्चा अमरावती जिल्ह्यात सुरू झाली आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नियमा प्रमाणे संचालकाला न्यायालयाने एक वर्षापर्यंत शिक्षा सुनावली असेल तर अशा संचालकांना बँकेच्या पदावर राहता येत नाही. याच नियमाचा दाखला देत विरोधी गटातील बारा संचालकांनी बच्चू कडूना संचालक पदावरून अपात्र करण्याची मागणी केली आहे.
कारण, बच्चू कडू यांच्यावर 2017 मध्ये नाशिक मधील सुकरवाडा पोलीस स्टेशन येथे शासकीय कामात अडथळा व मारहाण करण्यात संदर्भातील गुन्हे दाखल आहेत. याच प्रकरणात त्यांना नाशिकच्या विशेष न्यायालयाने एक वर्षापर्यंतच्या कठोर कारावासाची शिक्षा 2021 मध्ये सुनावली आहे. या शिक्षेला बच्चू कडूंनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.