Bachchu Kadu : प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांना विधान परिषदेची आमदारकी देण्यात आली. मात्र या प्रवेशामुळे प्रहार संघटनेत मोठी नाराजी निर्माण झाली आहे. विशेषतः मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमधील पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज झाले असून, शुक्रवारी त्यांनी मोठ्या संख्येने शिवसेना (ठाकरे गट) मध्ये प्रवेश केला. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’ निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “आपल्यातून जो गेला तो जुना शिवसैनिकच होता. घरी बोलवून त्याला मंत्री केला ही माझी चूक झाली. जे लोभापायी गेलेत त्यांना जाऊ द्या, कार्यकर्ते माझ्यासोबतच आहेत याचा मला आनंद आहे.” उद्धव ठाकरेंच्या या हल्ल्याला बच्चू कडू यांनी आता जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. एका पत्रकार परिषदेत बोलताना बच्चू कडू यांनी अनेक गंभीर दावे केले आणि मोठा गौप्यस्फोट केला. Bachchu Kadu बच्चू कडू (Bachchu Kadu) म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी त्यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु शेवटी केवळ राज्यमंत्री पद देण्यात आले. माझ्या जागी गडाख यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले. गुवाहाटीला जाण्यापूर्वी मी उद्धव ठाकरेंना याबाबत विचारले होते. शिवाय, एकनाथ शिंदे यांनीच उद्धव ठाकरेंशी माझी भेट घालून दिली होती, असे त्यांनी स्पष्ट केले. बच्चू कडू यांनी पुढे म्हटले की, आमच्या मतांच्या पाठिंब्यामुळेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. आम्ही त्यांच्या घरी जाऊन त्यांना पाठिंबा दिला होता. संख्याबळ वाढवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी आम्हाला गळ घातली होती. ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचे होते म्हणून त्यांनी मला मंत्री पद दिले. मात्र त्यांनी मला दिव्यांग मंत्रालय दिले नाही आणि माझ्याऐवजी गडाख यांना कॅबिनेट मंत्रिपद दिले. शिवसेना फुटल्याचे खापर माझ्यावर फोडू नका, असेही ते म्हणाले. बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला थेट उत्तर देताना म्हटले की, उद्धव ठाकरे माझ्याबद्दल जे काही बोलले ते मनापासून बोलले असं वाटत नाही. “आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री केलं, मग आम्ही चूक केली असं म्हणणार का?” असा सवालही त्यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे. बच्चू कडू यांचा हा पलटवार आणि प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा ठाकरे गटामध्ये झालेला प्रवेश यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा शिवसेना दोन्ही गटांतील जुना वाद तापला आहे. मराठवाडा भागात या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना उधाण आले आहे.