कबीर बोबडे
नगर – बाळाचा जन्म झाल्यानंतर अवघ्या काही तासात बाळाचे आधार नोंदणी होणार आहे, अशी योजना शासनाने सुरू केली असून या योजनेची अंमलबजावणी येत्या नवीन वर्षाच्या मुहूर्तावर म्हणजे 1 जानेवारी 2020 पासून होणार आहे.
महाराष्ट्रातील जिल्हा रूग्णालय, उपजिल्हा स्त्री रूग्णालय, ग्रामीण रुग्णालय व आरोग्य संस्थांमध्ये ही सुविधा एकाच वेळी उपलब्ध करून देण्यात आली आहे. आधारकार्ड नोंदणीसाठी होणारी पायपीट व अडचण लक्षात घेता शासनाने आधार नोंदणी सुलभरीत्या व्हावी, त्यासाठी बाळ जन्मताच बाळाची आधार नोंदणी केली जाणार आहे.
बाळाला जन्मल्या बरोबरच शासन आधार देणार आहे. या आधारकार्डच्या नोंदणीसाठी बाळाच्या हाताचे ठसे शिवाय डोळ्याच्या बाहुल्यांची प्रतिमा आणि ओळखपत्र अशी कागदपत्रे लागणार आहेत. या शिवाय बाळाचे आधार कार्ड काढण्यासाठी संबंधित बाळाच्या वडिलांचे किंवा पालक म्हणून कर्तव्य बजावत असलेल्या व्यक्तीचे ओळखपत्र देखिल आवश्यक असणार आहे.
याशिवाय बाळाचे फोटोद्वारे आधार संकलन केले जाणार आहे. रुग्णालयातून सुट्टी होण्यापूर्वीच बाळाच्या हाती त्याचे आधार असणार आहे, असे जिल्हा शल्य चिकीत्सक यांनी सांगितले. बाळ जन्मल्या नंतर त्याला लगेचच रुग्णालयात आधार कार्ड देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून यासाठी आरोग्य विभाग व भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण विभाग यांच्यावतीने संबंधितांना चार दिवसाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
राज्यातील 34 जिल्ह्यात प्रत्येकी एक निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांसह दोन कर्मचाऱ्यांच्या यात समावेश करण्यात आला आहे. हेच प्रशिक्षित कर्मचारी आपल्या जिल्ह्यात 17 डिसेंबर रोजी प्रत्येक आरोग्य संस्थेत रुजू केलेल्या एक परिचारिका व लिपिक वर्गीया कर्मचाऱ्याला माहिती देणार आहेत. प्रत्येक आरोग्य संस्थेत परीक्षा घेऊन एक परिचारिका व एक लिपिक वर्गीय कर्मचारी आधार नोंदणीसाठी नियुक्त केले जाणार आहे.
प्रत्येक नोंदणीला या कर्मचाऱ्यांना 27 रुपये मानधन दिले जाणार आहे. शंभर रुपये मानधन देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. मात्र सध्या 27 रुपये मानधन म्हणून दिले जाणार आहेत. जन्मल्या जन्मल्या आधारकार्ड देण्याच्या या सुविधेसाठी संबंधित जिल्ह्याच्या प्राधिकरण कार्यालयाची मदत घेतली जाणार आहे. आरोग्य विभागाने पहिल्यांदाच अशी सुविधा सुरू करून दिल्यामुळे जन्मताच बाळाची आधार नोंदणी होणे शक्य झाले आहे.
हा उपक्रम जिल्हाभरात केवळ जिल्हा सर्वसामान्य रूग्णालयातच राबविला जाणार आहे. तालुक्याच्या अथवा ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रात तूर्तास ही सुविधा उपलब्ध होणार नाही. प्रायोगिक तत्वावर हा प्रयोग जिल्हा पातळीवर यशस्वी झाल्यानंतर तो तालुका व ग्रामीण पातळीवर राबविण्याचा आरोग्य विभागाचा मानस आहे. यापूर्वीही हा प्रयोग 2015 मध्ये जिल्हा रुग्णालयात राबविण्यात आला होता. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सहकार्य न मिळाल्याने अल्पावधीत बंद पडली होती.आता नव्याने सुरु होणारी हीच योजना राबविण्याचे आव्हान आहे.
यापूर्वी आपण 2015 मध्ये जिल्हा रूग्णालयात बाळाला जन्मल्याबरोबरच आधारकार्ड देण्याची सुविधा निर्मान करून दिली होती. त्यात साधारणत: दोनशेक लोकांना आधार काढून दिले होते. मात्र, नंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील आधारकार्डच्या कर्मचाऱ्यांनी आपल्याकडे येणे बंद केले. आता आपण सध्या जिल्हा रूग्णालयात आधार देण्याची सुविधा होत आहे. जानेवारी 2020 पासून हे सुविधा असणार आहे.
डॉ. बापूसाहेब गाढे, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक