रांची : झारखंडची सत्ता काबीज करणाऱ्या झामुमो प्रणित महाआघाडीचे बळ आणखी वाढले आहे. त्या आघाडीला आता माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी यांच्या झारखंड विकास मोर्चा (प्रजातांत्रिक) या पक्षाने पाठिंबा जाहीर केला आहे. नियोजित मुख्यमंत्री आणि झामुमोचे कार्याध्यक्ष हेमंत सोरेन यांनी मंगळवारी मरांडी यांची भेट घेतली.
त्यानंतर मरांडी यांच्या पक्षाने नव्या महाआघाडी सरकारला पाठिंबा जाहीर केला. मरांडी यांच्या पक्षाने नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत 3 जागा जिंकल्या. त्या पक्षाच्या पाठिंब्यामुळे एकूण 81 जागा असणाऱ्या झारखंड विधानसभेत झामुमो प्रणित महाआघाडीचे संख्याबळ 50 पर्यंत पोहोचेल.
त्या महाआघाडीत कॉंग्रेस आणि राजदचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीत मरांडी यांचा पक्ष त्या महाआघाडीचा घटक होता. मात्र, महाआघाडीतून बाहेर पडून मरांडी यांच्या पक्षाने विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवली. विधानसभा निवडणुकीत समाधानकारक यश मिळवू न शकल्याने आणि महाआघाडीला स्पष्ट बहुमत मिळाल्याने मरांडी यांच्या पक्षाचे किंगमेकर बनण्याचे स्वप्न विरले आहे.