सुशांतसिंह प्रकरणावरुन बबिता फोगटचे ठाकरे सरकारवर टीकास्त्र

मुंबई – सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला दिल्यामुळे महाराष्ट्रातील ठाकरे सरकारला चांगलाच फटका बसला आहे, अशा शब्दात भारताची महिला कुस्तीपटू व भारतीय जनता पक्षाची नेता बबिता फोगट हिने महाराष्ट्र सरकारवर केली आहे.

अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येबाबतच्या तपासाची सुत्रे सीबीआयकडे सर्वोच्च न्यायालयाने सोपवली. यावरुनच राज्यातील सरकारचे अपयश स्पष्ट झाले. या प्रकरणाचा तपास करण्यास आता सीबीआय सक्षम आहे. मात्र, यातून महाराष्ट्र सरकार कुचकामी ठरले, असेही बबिताने म्हटले आहे.

सातत्याने वादग्रस्त विधाने करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या बबिताने केलेल्या टीकेवर अद्याप सरकारने कोणतीही प्रतिक्रीया व्यक्त केलेली नाही. पाटणा येथे दाखल झालेल्या खटल्यावर महाराष्ट्र सरकारचा जबाबही गेण्यात आला होता. बिहार सरकारने हे प्रकरण अत्यंत चुकीच्या धारणेतून दाखल केल्याचे मत महाराष्ट्र सरकारने मांडले होते. तसेच मुंबई पोलीस अत्यंत योग्यपद्धतीने तपास करत असताना हा तपास सीबीआयकडे सोपवणे योग्य नसल्याचेही सरकारने म्हटले होते.

मात्र, बिहार सरकारने मात्र पाटण्यात दाखल केलेले प्रकरण योग्यच असल्याचे सर्वोच्चन्यायालयाने मान्य केले व त्यातूनच महाराष्ट्र सरकारला फटका बसला आहे. मुंबई पोलिसांवर राजकीय दबाव असून याच कारणामुळे मुंबईत अजूनही हे प्रकरण दाखल झालेले नाही, असे बिहार सरकारने सांगितल्यामुळे महाराष्ट्र सरकारचे दुर्लक्षच अधोरेखित होत आहे, असेही बबिताने सांगितले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.