करोनानंतरची भरणारी पहिलीच मोठी यात्रा
लोणी देवकर – राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले इंदापूर तालुक्यातील रूई येथील बाबीर यात्रा महोत्सव बुधवारपासून सुरू होत असून तीन दिवस भरण्याऱ्या यात्रेची सांगता शुक्रवारी (दि. 28) होणार आहे. यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकासाठी श्री बाबीर देवस्थान व ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी पूर्ण झाली आहे.
यात्रेच्या पहिल्या दिवशी बुधवारी (दि. 26) पारंपरिक वाद्यांच्या व फटाक्यांची आतिषबाजी करत बाबीरबुवाची पालखी मोठ्या भक्तीमय वातावरणात लाखो भाविकांच्या उपस्थितीत रूई गावाकडून मंदिराकडे प्रस्थान करील. देवस्थानचे अध्यक्ष अजितसिंह पाटील व देवाचे भगत मंडळी यांच्या हस्ते घट उद्यापन अभिषेक व पूजा होणार आहे. दिवसभर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
गुरुवारी (दि. 27) यात्रेच्या मुख्य दिवशी यात्रेकरूंसाठी व भाविकांसाठी धनगर समाज बांधवांची लोकप्रिय असलेली गजढोल नृत्य स्पर्धेचे व बाबीर भाविक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे आणि कृषी प्रदर्शन देखील आयोजित केले आहे. संध्याकाळी मंगला बनसोडे यांचा लोकनाट्य तमाशाचा करमणूकीचा कार्यक्रम होणार आहे.
यात्रेच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी (दि. 28) पकाळणी व भाकणूकीचा कार्यक्रमाने यात्रेची सांगता होईल. यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायतच्या वतीने जोरदार तयारी करण्यात आलेली आहे. सर्व पाण्याचा टाक्यांचे शुद्धीकरण केले आहे. लाईट व आरोग्यविषयक सर्व सोयी सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. तसेच मंदिर परिसरात स्वच्छता करण्यात आली आहे.
भाविकांना मुबलक पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. यात्रेसाठी सुमारे 150 पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दोन पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांच्या सोयीसाठी जादा एसटी बसची सोय करण्यात आली आहे.