बाबा रामदेव यांची पतंजली शर्यतीत

प्रायोजकतेसाठी लावणार बोली

नवी दिल्ली – व्हिवोशी असलेला करार संपुष्टात आणल्यानंतर आयपीएलसाठी मुख्य प्रायोजकाचा सध्या शोध सुरू आहे. त्यातच देशातील अग्रगण्य औषध कंपनी असा नावलौकिक मिळवलेल्या योगगुरू रामदेव बाबा यांच्या पतंजली या कंपनीने या स्पर्धेचे मुख्य प्रायोजकत्व मिळावे यासाठी तयारी सुरू केली आहे.

या शर्यतीत सध्या ऍमेझॉन तुल्यबळ मानली जात असली तरीही पतंजलीने जर व्हिवोइतकीच रक्कम देण्याची तयारी दर्शवली तर प्रथमच पतंजलीचे नाव एका क्रिकेट स्पर्धेशी जोडले जाणार आहे. आयपीएलची मुख्य प्रायोजकता मिळावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. या स्पर्धेद्वारे पतंजली कंपनीचे नाव जगभरात जाणार असल्याने कंपनी लोकल ते ग्लोबल अशी लोकप्रियता मिळवेल, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

व्हिवोशी बीसीसीआयचा 2 हजार 199 कोटींचा करार होता. यातून बीसीसीआयला दरवर्षी 440 कोटी रुपये मिळत होते. नवा प्रायोजक इतकीच रक्कम देणार का, हा प्रश्‍न आहे. मात्र, पतंजली या शर्यतीत उतरल्यामुळे परदेशी कंपनीपेक्षा देशी कंपनीशीच करार करा, असे दडपण बीसीसीआयवर येण्याची शक्‍यता आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.