राज्यात बाबा रामदेव यांच्या ‘करोनील’ औषधाची विक्री होणार? गृहमंत्री अनिल देशमुख यांची ‘महत्वपूर्ण’ माहिती

मुंबई – करोना संसर्गावरील उपचारासाठी कोणत्याही पारंपरिक औषधाला मान्यता दिली नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे ‘कोरोनिल’ औषधाला जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमाणिकरणानुसार आयुष मंत्रालयाने मान्यता दिल्याचा पतंजली आयुर्वेद कंपनीचा दावा खोटा ठरलाय. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील “सक्षम आरोग्य संस्थांकडून योग्य प्रमाणीकरण झाल्याशिवाय पतंजलीच्या कोरोनिल औषध विक्रीस महाराष्ट्रात परवानगी दिली जाणार नाही.” असं स्पष्ट केलं. 

याबाबत आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर भूमिका मांडताना देशमुख यांनी, “पतंजलीच्या कोरोनिल औषधाच्या वैद्यकीय चाचणीवर इंडियन मेडिकल असोसिएशनने प्रश्न उपस्थित केले असून, जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा हे औषध करोनावर परिणामकारक असल्याचा पतंजली आयुर्वेदचा चुकीचा दावा फेटाळला आहे. इतक्या घाईने हे औषध बाजारात आणण आणि दोन ज्येष्ठ केंद्रीय मंत्र्यांनी याला समर्थन देणं योग्य नाही.” असं म्हटलंय.

तसेच, “जागतिक आरोग्य संघटना, इंडियन मेडिकल असोसिएशन व इतर संबंधित सक्षम आरोग्य संस्थांकडून योग्य प्रमाणीकरण झाल्याशिवाय पतंजलीच्या कोरोनिल औषध विक्रीस महाराष्ट्रात परवानगी दिली जाणार नाही.”असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.


तर, केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्या उपस्थितीत हे औषध बाजारात दाखल करण्यात आल्याने आरोग्यमंत्र्यानीच उघडपणे देशवासीयांची दिशाभूल केल्याचा आरोप ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने  केला आहे. या कथित औषधाला कोणत्या निकषांच्या आधारे मान्यता देण्यात आली, त्याचा तपशील जाहीर करण्याची मागणीही ‘आयएमए’ने केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.