नवी दिल्ली – ‘बाबा का ढाबा’च्या मालकाचा युट्यूबवर भावनिक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ते कमालीचे प्रसिद्धि झोतात आले होते. यानंतर बाबा का ढाबा चे मालक कांता प्रसाद आणि युट्यूबर गौरव वासन यांच्यात पैशांच्या फसवणुकीवरून चांगलाच वाद पेटला. या संबंधित वादावर दिल्ली पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे.
या चौकशीदरम्यान पोलिसांनी न्यायालयासमोर अहवाल सादर केला आहे. यानुसार मदत म्हणून बाबा का ढाबाचे मालक कांता प्रसाद यांच्या खात्यावर ४२ लाख रुपये जामा झाले होते. कांता प्रसाद यांनी न्यायालयामध्ये याचिका दाखल करुन या खात्यासंदर्भातील माहिती देण्यात यावी अशी मागणी केली होती.
तत्पूर्वी, पैशांच्या वादानंतर कांता प्रसाद यांनी युट्यूबर गौरव वासन यावर संशय घेत जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याची तक्रार दाखल केली होती. दरम्यान, बाबा का ढाबा चे मालक कांता प्रसाद यांनी काही दिवसांपूर्वीच नवीन रेस्टॉरंट उघडले होते. असे म्हंटले जात आहे की युट्यूबर गौरव वासनने केलेल्या मदतीच्या जोरावर मालवीय नगरमध्ये स्वत:चं रेस्तराँ सुरु केलं आहे. सध्या या रेस्तराँध्ये ग्राहकांची गर्दी कमी असली तरी ऑनलाइन प्रतिसाद चांगला आहे.