बाप रे…! बारा दिवसांत करोनाचे 239 बळी

दोन महिन्यांत 68 हजार 96 नागरिकांना करोनाची बाधा

पिंपरी – गेल्या 13 महिन्यांपासून शहरात ठाण मांडून बसलेल्या करोनाने गेल्या अकरा दिवसांमध्ये खूपच भीषण रुप दाखविले आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या बारा दिवसांमध्ये करोनामुळे 239 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान करोनाचा उतरता आलेख पाहता हा आजार आता संपुष्टात येईल, असे वाटत होते. परंतु मार्चमध्ये करोनाने पुन्हा एकदा थैमान घालण्यास सुरुवात केली आणि अवघ्या दोन महिन्यांमध्ये शहरामध्ये तब्बल 68हजार 96 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 557 बाधितांचा मृत्यू झाला आहे.

मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे वैद्यकीय यंत्रणेवर ताण आला असून ऑक्‍सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिविर यांचा तुटवडा जाणवू लागला आहे. परिणामी मृतांच्या संख्येमध्ये हळूहळू वाढ होऊ लागली आहे. गेल्या 13 महिन्यांमध्ये पिंपरी चिंचवड शहरातील बाधितांच्या संख्येने 1 लाख 69 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. त्यापैकी 68हजार 96बाधित हे गेल्या दोन महिन्यांत म्हणजेच 15 फेब्रुवारी ते 12 एपिल दरम्यान आढळले आहेत.

नोव्हेंबर महिन्यापासून शहरातील करोनाचा आलेख उतरता होता. त्यामुळे मृतांच्या संख्येमध्येही घट झाली होती. 31 डिसेंबर 2020 पर्यंत शहरात करोनाने 2488 रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यामध्ये 1757 रुग्ण शहरातील तर 731 रुग्ण बाहेरील होते. फेब्रुवारीच्या मध्यापासून शहरातील करोनाचा संसर्ग वाढला. बाधितांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होऊ लागली. परिणामी अपुऱ्या सोयी-सुविधाअभावी रुग्णांच्या मृतांमध्येही वाढ झाली आहे. 15 फेब्रुवारीपासून आजपर्यंत शहरामध्ये तब्बल 68 हजार 96 नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 557 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

शहरामध्ये 15 फेब्रुवारी ते 1 मार्च या कालवधीत 27 बाधितांचा मृत्यू झाला होता. तर त्यापुढील 15 दिवसांत म्हणजेच 1 ते 15 मार्च दरम्यान 45 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर शहरातील बाधितांमध्ये सातत्याने वाढ होत गेली. यामुळे 15 मार्चअखेर शहरामध्ये 1 लाख 14 हजार 754 जणांचा करोनाची लागण झाली होती. त्यानंतर अवघ्या 28 दिवसांमध्ये 55 हजार जणांना करोनाची लागण झाली. एवढ्या मोठ्या प्रमाणावर बाधित येत असल्याने शहरात बेडची कमतरता जाणवू लागली. परिणामी मृतांमध्ये वाढ झाली आहे. 15 मार्चनंतर 28 दिवसांत शहरात 426 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

337 गंभीर रुग्ण
रुग्णांना वेळेत बेड उपलब्ध होत नसल्याने गंभीर रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. श्‍वास घेण्यासाठी त्रास होणे तसेच शहरातील ऑक्‍सिजनची पातळी कमी झाल्याने रुग्णांना ऑक्‍सिजन लावण्याची वेळ येते. वेळेत उपचार न झाल्याने रुग्णांची प्रकृती खालावत आहे. आज 337 रुग्णांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. तर 195 अतिगंभीर रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.