मुंबई : भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांचे रविवारी सकाळी निधन झाले. मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लतादीदींच्या पार्थिवावर शिवाजी पार्क मैदानात शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी सर्वच क्षेत्रांतील मान्यवर आणि संगीतप्रेमींची गर्दी लोटली होती. दरम्यान, या शोकाकुल वातावरणात एका जिव्हाळ्याच्या क्षणांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तो जिव्हाळ्याचा आणि आपुलकीचा क्षण म्हणजे सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि सुप्रिया सुळेलता दीदींच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित होते. अंत्यदर्शनावेळचा त्यांचा एक फोटो, व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकजण बाप आणि लेकीच्या नात्याचे कौतुक करत आहेत. बाप आणि लेकीचा हा जिव्हाळा अनेकांना भावूकही करत आहे.
लतादीदींच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतल्यानंतर शरद पवार खुर्चीवर येऊन बसले. यावेळी ते बूट घालण्यासाठी खाली वाकणार होते. वडिलांना खाली वाकून बूट घालण्यास त्रास होईल म्हणून सुप्रिया सुळे पुढे सरसावल्या आणि त्यांनी खाली बसून वडिलांच्या पायात बूट घातले. त्यांच्या या कृतीचे सर्वांनी भरभरून कौतुक होताना दिसत आहे.