– रामचंद्र सोनवणे
राजगुरूनगर : राजगुरूनगर येथील न्यायालयापासून ४०० मीटर अंतरावर नवीन दुचाकीचा अचानक स्फोट झाल्याने बाप लेक गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली.
संतोष प्रभाकर शेवाळे वय ३२ त्यांचा मुलगा यश प्रभाकर शेवाळे वय १० रा तोरणा रेसिडेन्सी खंडोबा माळावर अहिल्यादेवी चौक राजगुरूनगर, असे जखमी झालेल्याची नावे आहेत.
राजगुरूनगर येथील तोरणा रेसिडेन्सी खंडोबा माळावर राजगुरूनगरमध्ये राहणारे संतोष प्रभाकर शेवाळे हे त्यांचा मुलगा यश याला घेऊन जार मध्ये पिण्यासाठी पाणी आणण्यासाठी त्यांच्या हिरोहोंडा दुचाकी क्र एमएच १४ जेएन ४३१७ वरून जात होते.
घरापासून १०० अंतरावर हा स्फोट त्यात संतोष शेवाळे याचे दोन्ही पाय मांड्यांजवळ फाटले व रक्तबंबाळ झाले. तर मुलगाही गंभीर जखमी झाला आहे.
स्फोटाच्या आवाजाने अनेक जण स्फोट झालेल्या ठिकाणी गोळा झाले.अतुल ठाकूर, लाला सावंत, शंकर बोंबले यांनी जखमी संतोष व त्यांचा मुलगा यश याला तात्काळ दवाखान्यात दाखल करण्यात आले.
दुचाकीच्या पेट्रोल टाकीचा स्फोट झाल्याने दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात गाडीच्या चिंधड्या उडाल्याअसून संतोष हा गंभीर जखमी झाला. त्यांच्या मागे बसलेल्या मुलगाही जखमी झाला आहे.
संतोष शेवाळे यांनी तीन महिन्यापूर्वी नवीन हिरोहोंडा गाडी घेतली होती. नवीन गाडी असतानाही तिचा स्फोट कसा झाला याबाबत पोलीस तपास सुरु आहे. घटनस्थळी खेड पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी यांच्यासह पोलीस पथके यांनी भेट देऊन घटनेची सखोल चौकशी सुरु केली आहे.
हिरोहोंडा कंपीनीच्या नवीन गाडीचा स्फोट झाल्याने भीतीजन्य वातावरण निर्माण झाले आहे. नवीन गाडीचा स्फोट झाल्याने त्यास संबंधित कंपनी जबाबदार असल्याचे नागरिकांचे म्हणणे असून कंपनीने याबाबत तात्काळ चौकशी करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.