बंगळुरू : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांचे पुत्र बी.वाय.विजयेंद्र यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवले जाणार नसल्याचे भाजपने स्पष्ट केले. त्यामुळे येडियुरप्पा पुत्राला भाजप श्रेष्ठींकडून अभय मिळाल्याचे स्पष्ट होत आहे. कर्नाटक भाजपमधील अंतर्गत धुसफूस वाढून गटबाजीला उधाण आले आहे.
ज्येष्ठ आमदार बसनगौडा पाटील यत्नाल यांच्या नेतृत्वाखालील गट विजयेंद्र यांचे नेतृत्व स्वीकारण्यास तयार नाही. तो गट सातत्याने येडियुरप्पा आणि विजयेंद्र या पिता-पुत्रांना लक्ष्य करत आहे. भाजपची प्रदेश शाखा ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न पिता-पुत्र करत आहेत. विजयेंद्र राज्यातील सत्तारूढ कॉंग्रेसशी तडजोडीचे राजकारण करत आहेत, असा आरोप त्या गटाकडून होत आहे.
पक्षांतर्गत धुसफुशीतून विजयेंद्र यांना हटवण्याची मागणीही पुढे आली. मात्र, ती मागणी भाजपचे कर्नाटक प्रभारी राधामोहनदास आगरवाल यांनी शनिवारी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावली. कुणाच्या मागणीवरून पक्षात नेतृत्वबदल होत नाही. तो निर्णय पक्षाचे केंद्रीय नेतृत्व आणि तळागाळातील कार्यकर्त्यांवर अवलंबून असतो, असे त्यांनी म्हटले. त्यातून भाजपश्रेष्ठी विजयेंद्र यांच्या पाठिशी असल्याचे स्पष्ट झाले.