आभाळच फाटलंय … अन ठिगळ विरलंय

आंबील ओढा आझादनगर आपत्तीग्रस्तांना अश्रू अनावर

पुणे : साडेनऊ-दहा वाजले असतील.. कोणाच्या घरात जेवणाची तर कोणाच्या घरात झोपण्याची तयारी सुरू असताना अचानक पाण्याचा मोठा प्रवाह धडकला आणि काहीच वेळात घर पाण्यात बुडालं.. हाती लागले ते घेऊन जीव वाचवताना रात्रभर उघड्यावर काढली.. आता लेकरांना घास कुठून भरवायचा? आजचा रोजगार बुडाला.. सकाळपासून पोटात पाण्याचा थेंब नाही, आता जगायचं कसं? अशा व्यथा आंबील ओढा आझादनगर येथील रहिवाश्यांनी मांडल्या..एका डोळ्यात काळजी तर दुसऱ्या डोळ्यात उद्याची भ्राअंत यावेळी दिसून आली..

साधारण 500 उंबऱ्यांच्या या वसाहतीला बुधवारच्या पावसाचा तडाखा बसला. आंबील ओढ्याला अगदी लागून असलेल्या या घरांत गुडघाभर पाणी गुरुवारी दुपारपर्यंत होते. गॅस सिलिंडर, भांडी-कुंडी, टीव्ही, पलंग, घरगुती साहित्य, कपडे असं सगळंच ओढ्यानं गिळलं तिथं लेकरांच्या वही पुस्तकांची काय बात?

याबद्दल नुकसानग्रस्त नागरिकांशी चर्चा केली असता, ते म्हणाले ‘पाण्यातून जीव वाचवताना रात्रभर कसरत झाली. मदतीला कोणीही नाही. पावसाची रिपरिप सुरूच होती. रात्री अडीच वाजता पोलिसांनी पाहणी केली. नंतर कोणीही आलेलं नाही. सकाळी पिण्यासाठी पाणीसुद्धा नव्हतं. 11 वाजता टँकर आला, पण सगळी भांडी वाहून गेली. पाणी भरायचं कशात? आता पुढचे काही दिवस आम्हाला घरातला चिखलगाळ काढावा लागणार आहे. त्यामुळे रोजगार बुडणार आहे.’

‘बुधवारच्या रात्री ओढ्याचा प्रवाह जोरदार होता. यात बऱ्याच ठिकाणी अडथळे आल्यामुळे पाणी अडवलं गेलं. त्यामुळे फुगवटा निर्माण होऊन प्रवाह उलट दिशेनं आला. त्याचा फटका बसून वसाहतीत पाणी शिरलं,’ असंही काही नागरिक म्हणाले.

दरम्यान, हे रहिवासी शासकीय यंत्रणेकडून मिळणाऱ्या मदतीच्या प्रतीक्षेत असून तातडीने पंचनामा करण्याची मागणी होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.