‘एलिफन्ट्स डू रिमेंबर’चा 16व्या मिफमध्ये राष्ट्रीय स्पर्धा गटात शो

पृथ्वीतलावरच्या सर्व प्राण्यांमध्ये हत्तींची स्मृति सर्वात तीक्ष्ण असते, त्यांना त्यांच्या पूर्वजांच्याही स्मृति आठवत असतात, असे म्हणतात. म्हणजेच हत्ती एकाच जन्मात अनेक जन्म जगत असतात. अशाच एक व्यक्ती – रमा खांडवाला यांची भेट घडवणारा माहितीपट म्हणजे ‘एलिफन्ट्स डू रिमेंबर’ 16व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात राष्ट्रीय स्पर्धा गटात आज दाखवण्यात आला. विशेष म्हणजे या शो साठी 95 वर्षीय रमा खांडवाला स्वत: उपस्थित होत्या.

देश पारतंत्र्यात असतांना सगळीकडे स्वतंत्रतेसाठीच्या लढाया सुरु होत्या. नेताजी सुभाष चंद्र बोसही आझाद हिंद फौजेच्या माध्यमातून देश स्वतंत्र करण्यासाठी लढा देत होते. त्यांच्या ओजस्वी भाषणाने भारावून जात अनेक युवक-युवती आझाद हिंद फौजेत सहभागी होत होते. रमा खांडवाला यांचे कुटुंब त्यावेळी म्यानमारच्या रंगून इथे रहात होते. नेताजींच्या प्रेरणेमुळेच वयाच्या 17व्या वर्षी रमा आणि त्यांच्या भगिनी आझाद हिंद फौजेच्या रानी झासी रेजिमेंट मध्ये दाखल झाल्या. अत्यंत कोवळ्या वयात त्यांनी लष्करासाठीचे कठीण प्रशिक्षण पूर्ण केले आणि लवकरच आपल्या कामगिरीने त्या या रेजिमेंटमध्ये चांगल्या पदावरही पोहचल्या. कालांतराने देशाला स्वातंत्र्य मिळाले, या लढ्यात सुभाष बाबूंना साथ देणाऱ्या अनेकांनी नंतर आपले नवे आयुष्य सुरु केले. रमा खांडवाला मुंबईत स्थायिक झाल्या. दोन वर्ष जपानी सैन्यासोबत मिळालेल्या सहवासात त्या जपानी भाषा शिकल्या होत्या. याचा वापर करत त्या जपानी भाषेच्या शिक्षिका बनल्या तसेच टूरिस्ट गाईड म्हणूनही त्या काम करु लागल्या. अनुभवांची प्रचंड शिदोरी, नेताजींचा प्रत्यक्ष सहवास आणि चैतन्य या बळावर त्या लवकरच लोकप्रिय टूरिस्ट गाईड झाल्या. रमा खांडवाला आज 95 वर्षांच्या आहेत, आजही त्या पूर्ण तंदुरुस्त असून, 80 वर्षांपूर्वीच्या सगळ्या स्मृति त्यांना लख्खपणे आठवतात. देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा जिवंत इतिहास असलेल्या रमा खांडवाला यांच्या जीवन प्रवासावर माहितीपट काढावा, असे स्वाती पांड्ये, बिप्लव भाटिया आणि मनोहर बिष्त या अधिकाऱ्यांना वाटले. फिल्म्स डिव्हिजनच्या सहकार्यातून त्यांनी रमा यांच्या जीवनावर ‘एलिफन्ट्स डू रिमेंबर’ हा माहितीपट काढला. रमा यांचे प्रेरणादायी आयुष्य आजच्या पिढीपर्यंतही पोहोचावे आणि आजच्या पिढीला त्यातून प्रेरणा मिळावी, अशी मनापासून इच्छा असल्याने आम्ही हा माहितीपट तयार करायचे ठरवले, असे स्वाती पांड्ये यांनी माहितीपटाच्या शो आधी प्रसार माध्यमांशी बोलतांना सांगितले. या माहितीपटासाठी, फिल्म्स डिव्हिजनच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मदत केली, असेही त्या म्हणाल्या.

रमा खांडवाला यांनी उपस्थितांशी संवाद साधला. आपले अनुभव सांगतांना त्यांच्या देहबोलीतून उत्साह आणि चैतन्य ओसंडून वाहत होते. आपली विचार करण्याची पद्धत बदला आणि स्वत: आधी देशाचा विचार करा, अससा मोलाचा सल्ला त्यांनी नव्या पिढीला दिला.

गोव्यात झालेल्या इफ्फीमध्ये इंडियन पॅनोरमा विभागात देखील या चित्रपटाची निवड झाली होती.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.