आयुर्वेदीक काढ्याने करोनाला हरविले?

भोपाळ- करोनामुळे जगभरातील आरोग्य यंत्रणा जेरीस आलेल्या आहेत. शास्त्रज्ञ त्यावर उपाय शोधण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत. मात्र याच करोनावर आयुर्वेद या भारतीय चिकित्सा पध्दतीत तोडगा काढण्यात आल्याचा दावा मध्य प्रदेशच्या आयुष विभागाने केला आहे. आमचा आयुर्वेदीक काढा घेतल्याने करोनाचे रूग्ण बरे होत असल्याचे या विभागाने म्हटले आहे.

गेल्या महिनाभरात आम्ही या आयुर्वेदीक काढ्याचे जे प्रयोग केले आहेत, त्यांचा सकारात्मक परिणाम आम्हाला मिळाला असल्याचे विभागाने म्हटले आहे. आयुष विभागाचे आयुक्त एम. के. आग्रवाल म्हणाले की, राज्यातील 133 कोविड केअर सेंटर आणि क्वारंटाइन केंद्र येथे जेवढे रूग्ण होते, त्यांना सगळ्यांना आरोग्य कसायम हा काढा पिण्यासाठी देण्यात आला होता. त्या सगळ्यांना त्याची मात्रा लागू झाली असून हे रूग्ण बरे झाले आहेत.

सात औषधी वनस्पतींपासून हा काढा तयार केला जात असून गेल्या दीड महिन्यांपासून तो रूग्णांना दिला जात होता. या काढ्यात गुळूची, सुण्ठी, भूम्यामलकी, यष्टीमधु, मरिच, पिप्पली आणि हरितकी आदींचा समावेश करण्यात येतो. मध्य प्रदेशातील 31 जिल्ह्यांतील 133 केंद्रांवर त्याचा प्रयोग करण्यात आला होता. क्वारंटाइन करण्यात आलेल्या 3427 जणांपैकी 343 लोकांना आता घरी सोडण्यात आले असून अन्य जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.

आग्रवाल यांच्याच दाव्यानुसार एकूण 2994 रूग्णांपैकी 299 रूग्ण पूर्ण बरे झाले असून 95 रूग्णांचे तपासणी अहवाल अद्याप येणे बाकी आहेत. आयुष विभागाचा हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर खुद्द केंद्र सरकारने मध्य प्रदेशच्या या विभागाला आणखी संशोधन करण्याची सूचना केली असल्याचाही दावा करण्यात आला आहे.

याबाबत बोलताना मध्य प्रदेशचे आरोग्य मंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले की, आयुर्वेद ही भारतीय संस्कृती करोना विरोधातील लढ्यात अत्यंत उपयुक्त ठरली असून प्रत्येक भारतीयाने या काढ्याच्या जीवशैलीचा स्वीकार केला पाहिजे. जगभरातील शास्त्रज्ञांना अदयाप यावर औषध सापडलेले नाही. मात्र मध्य प्रदेशात ज्याप्रमाणे आम्ही करोनाला पराभूत केले आहे, ते पाहता हजारो वर्षांपूर्वीची आयुर्वेद ही प्राचीन भारतीय चिकित्सा पध्दतीच करोनावर विजयी ठरू शकते हे यामुळे सिध्द झाले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.