रहिमतपूर (प्रतिनिधी) – मेंदू हा मानवी शरीराचा मालक आहे. मेंदूत आजाराचे विचार वारंवार येऊ लागल्यास कोणताही आजार वाढत जातो. आजारामुळे माणसे मरतात, ही समाजाची मानसिकता बनली आहे.
ही मानसिकता वेळीच दूर झाली तर हे सुंदर जीवन माणसाला अधिक सुंदर करता येईल. आपल्या आयुर्वेदात आजाराचे मूळ नष्ट करण्याची ताकद आहे, असे मत राष्ट्रीय पारितोषिक विजेते निसर्गोपचार तज्ज्ञ स्वागत तोडकर यांनी व्यक्त केले.
पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्यावतीने स्वातंत्र्यदिन व संस्थेच्या अध्यक्ष सौ. चित्रलेखा माने-कदम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, रहिमतपूर येथील वीरशैव लिंगायत समाज मठात ‘औषधाविना आरोग्य’ या विषयावर ते बोलत होते. व्यासपीठावर सौ. चित्रलेखा माने-कदम व सौ. प्रियंका कदम यांची उपस्थिती होती.
तोडकर म्हणाले, भारताला थोर ऋषीमुनींची परंपरा आहे. ही संस्कृती जपण्याची जबाबदारी आपली आहे; परंतु ही परंपरा आपण विसरत चाललो आहोत. पूर्वीचे आजार वेगळे होते. वनस्पतींचे काढे, जडीबुटी त्यावर प्रभावी होते.
परंतु आजच्या काळात विविध औषधे, फळभाज्यांच्या माध्यमातून रसायनयुक्त पदार्थ आपल्या शरीरात जातात. याचे दुष्परिणाम शरीरावर होतात. शरीर तंदुरुस्त व निरोगी राहण्यासाठी सात्विक आहाराची गरज आहे.
थायरॉइड, रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, संधिवात, गुडघेदुखी, कंबरदुखी, केस गळणे, वात, पित्त, कफ, सर्दी, वांग, महिलांचा मासिक धर्म यावर आयुर्वेदिक उपचारच प्रभावी ठरतात.
याचे कोणतेही साइड इफेक्टस् होत नाहीत. कोणतीही पथ्ये पाळावी लागत नाहीत, असे सांगून त्यांनी या आजारांवर घरगुती पद्धतीने उपचार कसे करायचे याबाबत मार्गदर्शन केले. सौ. चित्रलेखा माने-कदम यांचे कर्तृत्व ऐकून होतो.
समाजाला काही तरी चांगले मिळावे यासाठी त्या निरपेक्ष भावनेने काम करत आहेत. आरोग्य शिबिरांचे आयोजन करून, त्या लोकांच्या आरोग्याची काळजी घेत आहेत. समाजात असे काम करणार्या व्यक्तींची संख्या दुर्मीळ असते, असे गौरवोद्गारही तोडकर यांनी काढले.
सौ. माने-कदम म्हणाल्या, अनुभवसंपन्न व्यक्तींचे मार्गदर्शन येथील नागरिकांना मिळावे, यासाठी संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. वनस्पतींमधील औषधी गुणधर्मांची पुरेशी माहिती आपल्याला नसते. पूर्वी घरगुती आजारांवरील उपचारांसाठी ‘आजीबाईचा बटवा’ प्रसिद्ध होता.
तो काळाच्या ओघात पडद्याआड गेला आहे. आजच्या काळातही निसर्गोपचार, आयुर्वेदिक उपचार उपयुक्त आहेत. प्राचार्य पी. पी. वावरे यांनी प्रास्ताविक केले. अरविंद आगलावे, अमित माने यांनी सूत्रसंचालन केले. अच्युत माने यांनी आभार मानले. डॉ. काकासाहेब परांजपे विद्यालयाच्यावतीने या कार्यक्रमाचे संयोजन करण्यात आले होते.