अयोध्या निकाल : सातारा पोलिसांची व्हॉट्‌सऍप ग्रुपवर करडी नजर

सातारा – अयोध्या निकालाच्या पार्श्‍वभूमीवर सातारा पोलिसांनी व्हॉट्‌सऍप ग्रुपवर करडी नजर ठेवली असून, कोणीही आक्षेपार्ह कमेंट्‌स करू नयेत, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. या पार्श्‍वभूमीवर शहरात कडेकोट बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.

दरम्यान, नागरिकांनी सोशल मिडीयातून अफवा पसरवू नये तसेच अफवा पसरवणार्‍याची माहिती तातडीने जवळच्या पोलीस ठाण्यात देण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी केले आहे.

येत्या तासात सर्वोच्च्य न्यायालयाकडून रामजन्मभूमी आणि बाबरी मस्जिदचा निकाल लागण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे. ग्रुप ऍडमीन म्हणून असणाजयांना सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आक्षेपार्ह फोटो, व्हिडिओ क्‍लिप व्हायरल करू नये, एखाद्याने आक्षेपार्ह फोटो, व्हिडिओ क्‍लिप पाठवली तर ती दुसऱ्याच्या मोबाइलवर फॉरवर्ड करू नये, जागेवरच ब्लॉक करावे तसेच संबंधिताचे नाव पोलिसांना तात्काळ कळवावे, काही अनुचित प्रकार घडल्यास ग्रुप ऍडमीन कायदेशीर कार्यवाहीस पात्र राहणार आहे, असेही पोलिसांनी सांगितले. खबरदारीचा उपाय म्हणून काही ग्रुप ऍडमीनना 149 सीआरपीसी प्रमाणे नोटीस देण्याची प्रक्रिया सुरू असून, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि धार्मिक संघटनेशी जोडलेल्या कार्यकर्त्यांसोबत पोलीस वारंवार बैठका घेत आहेत. निकाल लागल्यानंतर रस्त्यावर उतरून आनंदोत्सव साजरा करू नये, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.