अयोध्या प्रकरण : सर्वोच्च न्यायालयात आजपासून पुन्हा सुनावणीस सुरूवात

नवी दिल्ली : अनेक वर्षांपासून वादातीत असणाऱ्या अयोध्येतील जमिन प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी करण्यात येणार आहे. या प्रकरणाची सुनावणी आज महत्त्वाच्या आणि अंतिम टप्प्यात प्रवेश करणार आहे. विजयादशमीनिमित्त आठ दिवसांच्या सुटीनंतर सर्वोच्च न्यायालयाकडून या प्रकरणी 38व्या दिवशी सुनावणी पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.

या वादात मध्यस्थीच्या प्रक्रियेतून सौहार्दपूर्ण समझोत्याचे प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यांच्या घटनापीठाने या प्रकरणाची सुनावणी पूर्ण करण्यासाठीच्या मुदतीत सुधारणा करून त्यासाठी 17 ऑक्‍टोबर ही तारीख निश्‍चित केली आहे. अयोध्येतील 2.77 एकर जागा सुन्नी वक्‍फ बोर्ड, निर्मोही आखाडा आणि रामलल्ला या तीन पक्षकारांमध्ये समान विभागली जावी, असा आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने 2010 साली तीन दिवाणी दाव्यांमध्ये दिला होता. त्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात 14 अपील दाखल करण्यात आले आहेत.

सरन्यायाधीशांसह शरद बोबडे, धनंजय चंद्रचूड, अशोक भूषण व एस.ए. नझीर या न्यायाधीशांचाही समावेश असलेल्या घटनापीठाने या प्रकरणात दीर्घ युक्तिवादाच्या अंतिम टप्प्याचे वेळापत्रक निश्‍चित केले होते. त्यानुसार, मुस्लीम पक्षकार 14 ऑक्‍टोबरला युक्तिवाद पूर्ण करतील आणि त्यानंतर त्यावर प्रत्युत्तराचा युक्तिवाद करण्यासाठी हिंदू पक्षांना दोन दिवस दिले जातील. सुनावणी पूर्ण करण्यासाठी 17 ऑक्‍टोबर ही अखेरची तारीख असेल आणि तोपर्यंत सर्व पक्षांना त्यांचे अंतिम युक्तिवाद संपवावे लागतील. यापूर्वी पीठाने युक्तिवाद संपवण्यासाठी 18 ऑक्‍टोबर ही तारीख दिली होती. सरन्यायाधीश रंजन गोगोई 17 नोव्हेंबरला निवृत्त होणार असून, त्यापूर्वी या प्रकरणाचा निकाल जाहीर केला जाणार आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.