अयोध्या प्रकरणाला पुन्हा यु-टर्न

दोन्ही पक्षकारांचा पुन्हा न्यायालयाबाहेर तडजोडीचा विचार

नवी दिल्ली – अयोध्येतील वादग्रस्त जमिनीबाबत हिंदू आणि मुस्लिम पक्षकारांकडून सुरुवातीला न्यायालयाबाहेर तडजोड होऊ न शकल्याने गेल्या 23 दिवसांपासून याप्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात नियमित सुनावणी सुरु आहे. मात्र, आता पुन्हा एकदा मध्यस्थीद्वारेच या प्रकरणावर तोडगा निघावा यासाठी दोन्ही पक्षकारांनी सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या मध्यस्थी पॅनलला पत्र लिहिले आहे.

अयोध्या प्रकरणी नियमित सुनावणी होण्यापूर्वी मध्यस्थीने यावर तोडगा निघावा यासाठी सर्वोच्च न्यायालयाने एका पॅनलची स्थापना केली होती. या पॅनलद्वारे तोडगा काढण्यासाठी 155 दिवस प्रयत्न झाले.

मात्र, यावर कोणताही तोडगा निघू शकला नव्हता. या पॅनलमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्या. एफ. एम. कलीफुल्ला, वरिष्ठ वकील श्रीराम पंचू आणि आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर या तीन व्यक्तींचा समावेश आहे. मात्र, पॅनलद्वारेही तोडगा निघू न शकल्याने अखेर याप्रकरणी न्यायालयात नियमित सुनावणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

या सुनावणीदरम्यान हिंदू पक्षकारांचा युक्तीवाद पूर्ण झाला असून मुस्लिम पक्ष आता आपली बाजू मांडत आहे. या प्रकरणाची पाच सदस्यांच्या घटनापीठाद्वारे सुनावणी सुरु असून यामध्ये सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखाली न्या. एस. ए. बोबडे, डी. वाय. चंद्रचूड, अशोक भूषण आणि एस. अब्दुल नजीर यांचा समावेश आहे.

दरम्यान, या प्रकरणातील मुस्लिम पक्षकार सुन्नी वक्‍फ बोर्ड ज्यांनी या वादग्रस्त जमिनीवर आपला मालकी हक्क सांगितला असून त्यांनीच मध्यस्थीसाठी पत्र लिहीले आहे. त्यांनी म्हटले आहे की, चर्चेद्वारे हा प्रश्न सोडवण्याचे पुन्हा एकदा प्रयत्न करायला हवेत.

त्याचबरोबर, निर्वाणी आखाड्याने देखील चर्चेद्वारे प्रश्न सोडवण्याची इच्छा व्यक्त करीत पॅनलला पत्र लिहिले आहे. निर्वाणी आखाड्याच्या भुमिकेवर या प्रकरणातील एक पक्षकार निर्मोही आखाडा देखील सहमत आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.