अयोध्या: भूमिपूजनासाठी 175 जण निमंत्रित

अयोध्या: अयोध्येत होणाऱ्या राममंदिराच्या भूमिपूजनासाठी प्रख्यात अशा 175 व्यक्तींना निमंत्रित केले आहे. निमंत्रितांची ही यादी भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, विधीतज्ज्ञ के. पराशरन्‌ आणि अन्य मान्यवरांशी प्रत्यक्ष चर्चा करुन अंतिम केली आहे, अशी माहिती ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी दिली.

175 निमंत्रितांमध्ये विविध पंथांच्या 135 साधूंचा समावेश आहे. ते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. याशिवाय अयोध्येतील काही प्रख्यात व्यक्तींचा निमंत्रितांमध्ये समावेश आहे, असे ते म्हणाले.

विश्‍व हिंदु परिषदेचे नेते कै. अशोक सिंघल यांचे पुतणे सलील सिंघल हे या कार्यक्रमाचे यजमान असतील. नेपाळमधून काही साधूंना निमंत्रित करण्यात आले आहे. कारण त्यांचे बिहार, उत्तर प्रदेश आणि अयोध्येशी जवळीक आहे, असे त्यांनी सांगितले.

सरकारच्या वतीने पोस्टाच्या तिकिटाचे प्रकाशन करण्यात येईल, सदैव सुगंध देणाऱ्या पारिजातकाचे झाड यावेळी लावण्यात येईल. यावेळी मंदिरापासून प्रेरणाचे अनावरण होईल, असे ते म्हणाले.

निमंत्रण देताना करोनाचे भय लक्षात घेतले आहे. या हिंदू पध्दतीच्या विधीला कोणताही रंग देण्यात येणार नाही. रामलल्लाच्या कपड्यांचा रंगही पूजाऱ्यांनी ठरवलेला आहे. त्यात कोणत्याही दबावाने बदल होणार नाही, असेही राय यांनी स्पष्ट केले.


साधूंना जात नसते
साधू कोणत्या जातीचे आहेत असा प्रश्‍न विचारला असता ते म्हणाले, साधूंना कोणतीही जात नसते. त्यांनी संन्यास घेतल्यानंतर ते जातीच्या वर जातात, असे राय यांनी स्पष्ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.