येरवडा मनोरुग्णालयात आयाराम गयाराम वाढले

रुग्ण आणि नातेवाईकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न गंभीर

पुणे –
राज्यातील सर्वात मोठे असलेल्या येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयात आयाराम गयारामांची संख्या वाढली आहे. याठिकाणी सुरक्षारक्षक असूनही याठिकाणी कामाशिवाय येणाऱ्यांची आणि प्रमाणापेक्षा जास्त वेळ थांबणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे, त्यामुळे रुग्णांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्याची गंभीर दखल रुग्णालय प्रशासनाने घेतली आहे, त्याचाच एक भाग म्हणून या आयाराम गयारामांना आळा घालण्यासाठी प्रशासनाच्या वतीने उपाययोजना करण्यात येणार आहेत.

रुग्णालयाच्या अखत्यारित पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यासह अन्य विदर्भ आणि मराठवाड्यातील तब्बल 16 जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यामुळे याठिकाणी महिन्याकाठी किमान साठ ते सत्तर हजार नागरिक आणि त्यांच्या नातेवाईकांची ये- जा सुरू असते, त्याशिवाय या रुग्णालयात अडीच ते तीन हजार रुग्ण ऍडमिट असतात. विशेष म्हणजे हे रुग्णालय फुलेनगर ते आळंदी या मुख्य रस्त्यापासून किमान एक किलोमीटर अंतर आतमध्ये आहे. हा भाग निर्जन असल्याने आतमध्ये जाताना रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना जीव मुठीत धरुनच जावे लागते. मात्र, हे वास्तव असतानाही मनोरुग्णालयात प्रवेश करताना प्रवेशद्वारावर एकच सुरक्षारक्षक तैनात करण्यात आला आहे, विशेष म्हणजे या सुरक्षारक्षकाकडून नातेवाईक अथवा रुग्णांची कोणतीही विचारपूस केली जात नाही.

हे नातेवाईक अथवा रुग्ण मनोरुग्णालयात गेल्यानंतर त्यातील बहुतांशी नागरिक बराच वेळ तेथेच रेंगाळत बसतात. तरीही सुरक्षारक्षकाच्या माध्यमातून त्यांना कोणतीही विचारणा होत नाही. त्यामुळे येथे येणारे नातेवाईक आणि रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. या ढिसाळ सुरक्षा व्यवस्थेचा काही नातेवाईकांना फटका बसला होता. काही भामट्या चोरट्यांनी बाहेर गावाहून आलेल्या नातेवाईकांना हत्याराचा धाक दाखवून लुटल्याचे अनेक प्रकार यापूर्वी घडले आहेत. त्यामुळे काही नातेवाईकांनी यासंदर्भात मनोरुग्णालय प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या.

या प्रकाराची गंभीर दखल घेऊन याठिकाणच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याच निर्णय प्रशासनाने घेतला आहे, त्यानुसार आगामी काळात मनोरुग्णालयात येणाऱ्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी पास घेणे बंधनकारक करण्याचा प्रशासन गांभीर्याने विचार करीत आहे. त्याशिवाय गरज भासल्यास मनोरुग्णालयाच्या आवारातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्याही वाढविण्यात येणार आहे, अशी माहिती मनोरुग्णालय प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.