मुंबई : राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना मंगळवारी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने सोलापूरचे पालकमंत्रिपद सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री या अगोदर दोन वेळा बदल्याण्यात आले आहे. आव्हाड यांची काही दिवसापूर्वी सोलापूरच्या पालकमंत्रिपद नियुक्ती करण्यात आली होती.
मात्र,१३ एप्रिल रोजी आव्हाड यांनी स्वतःला मुंबईत क्वारंटाईन करून घेतले होते. मंगळवारी पुन्हा त्यांना ताप आणि श्वास घेण्यास अडचण येत असल्यामुळे मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना सोलापूरच्या पालकमंत्री पदावरून दूर करण्यात आले असुन त्यांच्या जागी दत्तात्रेय भरणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, आव्हाड यांना कोरोनाचे संक्रमण झाल्याची शक्यता आहे. त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्याला कोरोनाची बाधा झाल्याने त्यांनी स्वतःला १४ दिवसासाठी होम क्वारंटाईन केलं होतं. त्यावेळी त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. तसेच त्यांची मुलगी १६ मार्चला स्पेनमधून भारतात परतली होती. तिला कोरोनाची बाधा झाल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले होते. मात्र आव्हाड यांनी बातम्यात काही तथ्य नसल्याचे म्हटलं होतं. त्यानंतर आव्हाड यांना देखील कोरोनाचे संक्रमण झाल्याच्या बातम्या प्रसार माध्यमांनी दिल्या होत्या.