क्रांतीपर्व चित्रपट निर्मितीच्या प्रतिक्षेत 

10 वर्षे पटकथा तयार, पण अर्थसहाय्याची अडचण 

सातारा – भारतीय स्वातंत्र्यलढयात साताऱ्याचा धगधगता इतिहास म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील. हा तेजस्वी इतिहास रजत पटावर यावा याकरिता ज्येष्ठ अभिनेते विलास रकटे यांनी पुढाकार घेतला आहे. मात्र काळाच्या ओघात क्रांति अग्रणींचा इतिहास रजत पटावर झळकण्यासाठी स्वयंस्फूर्त अर्थसहाय्याची अडचण झाली आहे. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने क्रांतिसिंहनाना पाटील यांच्या जीवनावर आधारीत चित्रपटाची घोषणा करावी अशी अपेक्षा विलास रकटे उर्फ बापू यांनी व्यक्त केली आहे.

एकेकाळी मराठी चित्रळपटात नायक आणि खलनायक भूमिका बजावलेला हा अभिनेता सध्या गावातच असतो.त्यांच्याकडे क्रांतीपर्व नावाची ही पटकथाच तयार आहे.याबाबत बापू म्हणाले’, ही पटकथा तयार करायला आयुष्यातील दहा वर्षे गेलीत. पण हा चित्रपट निघावा अस कोणालाही वाटत नाही. देशासाठी आयुष्य वेचणाऱ्या क्रांतिसिंह नाना पाटील व त्यांच्या रोमहर्षक इतिहासावर चित्रपट निघत नाही. तो निघावा म्हणून कोणीही पुढं येत नाही. क्रांतिवीर नागनाथ आण्णा होते तोवर त्याना वाटत होतं. जी. डी. बापू यांनी तर मला अनेकदा बोलवून स्वातंत्र्य संग्रामातील गोष्टी ऐकवल्या होत्या. ज्या ठिकाणी त्याकाळात घटना घडल्या होत्या तिथं मला नागनाथ अण्णा घेऊन गेले होते. मी खुप अभ्यास करून हे लिहिलं आहे पण आर्थिक परिस्थितीमूळ घोड थांबलं आहे. मला काहीही नको पण माझ्या डोळ्यासमोर क्रांतीपर्व पडद्यावर यावा.

सामना चित्रपटात हिंदुरावच्या भूमिकेतून उदयास आलेल्या या अभिनेत्याने चित्रपटात भूमिका केल्याच पण प्रतिकार सारखे चित्रपट स्वतः बनवले. या चित्रपटाच्या माध्यमातून त्याना आर्थिक प्राप्ती झाली नाहीच पण कर्जात लोटले पण तरीही बापूंनी कोणाकडेही नाराजी व्यक्त केली नाही. उलट ते नव्या कामाकडे वळले. बापूंचा पिंड मूळचा लढाऊ माणसाचा. त्यांची लढाऊ वृत्ती त्यांच्या चितपटात दिसतेच पण व्यवहारातही दिसते. बापूंच बालपणही वाळवा तालुक्‍यातील क्रांतिकारकांच्या शौर्यकथा ऐकत गेलेलं.

मग त्याना सातारा जिल्ह्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली इंग्रजी राजवटीला हादरे देणाऱ्या पत्री सरकार वर चित्रपट निघाला पाहिजे असं वाटलं, त्यांनी खूप मेहनत घेऊन अनेक मुलाखती, पुस्तके वाचून तबबल दहा वर्षे राबून पटकथा लिहिली आहे. पण या चित्रपटासाठी लागणारी आर्थिक शक्ती त्यांच्याकडे नाही. त्यामुळे मेहनत करून लिहिलेली पटकथा बापूंच्या घरातील कपाटातच राहिली आहे. ही केवळ एका चित्रपटाची कथा नाही तर तो एका जागतिक कीर्तीच्या लढ्याचा इतिहास आहे. आणि हा इतिहास खूपच प्रेरणादायी आहे.विलास रकटे हे सुद्धा या उज्जवल इतिहासाचा वारसा जपणारे चित्रपटाच्या क्षेत्रातील वारसदारच आहेत आणि म्हणूनच त्यानी मेहनत करून चित्रपटाची कथा लिहिली आहे.

विला रकटे सांगतात,मला अनेकदा स्वप्न पडलंय क्रांतीपर्व मल्टिप्लेक्‍समध्ये सुरू आहे आणि हा आगळावेगळा चित्रपट बघायला इतकी गर्दी झालीय. की मलाही आता जाता येत नाही. बापूंच क्रांतीपर्वपडद्यावर येण्याचं स्वप्न सत्यात येईल का नाही हे माहिती नाही पण हा चित्रपट यावा हीच माझी एकमेव इच्छा आहे हा बापूंचा सांगावा आहे. हा सांगावा मनापासून धाडताना बापूंचे डोळे पाण्यानी गलबलले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.