इंडोनेशियात 6.2 तीव्रतेचा भूकंप; 30 जणांचा मृत्यू, 700 जखमी

जकार्ता : इंडोनेशियाला आज सकाळी भूकंपाचे मोठे धक्के बसले असल्याची माहिती समोर येत आहे. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 6.2 इतकी होती.

या भूकंपामध्ये एका मोठ्या रुग्णालयाची इमारत कोसळली असून त्याखाली अनेक रुग्ण आणि आरोग्य कर्मचारी अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सुलावेसी बेटावरील रुग्णालयाची इमारत या भूकंपामध्ये कोसळली आहे. या भूकंपामुळे आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू झाला असून 700 जण जखमी असल्याचे वृत्त आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.

भूकंपामध्ये रुग्णालय कोसळले आहे, अशी माहिती बचाव कार्याच्या कामात असलेल्या पथकातील अरिंतो या व्यक्तीने दिल्याचे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले आहे. मामुजू शहरामध्ये ही दूर्घटना घडली आहे. “या इमारतीच्या ढीगाऱ्याखाली रुग्ण आणि रुग्णालयातील कर्मचारी अडकले आहेत. आम्ही त्यांच्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहोत,” असंही अरिंतोने म्हटलं आहे. मात्र नक्की किती रुग्ण आणि कर्मचारी या इमारतीच्या ढीगाऱ्याखाली अडकलेत यासंदर्भातील माहिती देण्यात आलेली नाही.

या भूकंपाचा केंद्रबिंदू जमीनीखाली 10 किलोमीटर अंतरावर असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रथमिक अंदाजानुसार भूकंपाच्या केंद्रबिंदूजवळ असणाऱ्या सुलावेसी शहराला सर्वाधिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सध्या मदतकार्य सुरु असून मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रात्री एक वाजण्याच्या सुमारास भूकंपाचा पहिला मोठा धक्का जाणवला. 60 हून अधिक घरांची पडझड झाली आहे.

7 सेकंदांसाठी हा भूकंपाचा झटका जाणवला. या भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा देण्यात आलेला नाही. मात्र समुद्रकिनाऱ्यावर सतर्क राहण्याचे आदेश जारी करण्यात आलेत. गुरुवारीही इंडोनेशियातील काही ठिकाणी भूकंपाचे मध्यम स्वरुपाचे झटके जाणवले होते. सोशल मीडियावर या भूकंपानंतरचे अनेक व्हिडीओ शेअर करण्यात येत आहेत. यामध्ये लोक आपल्या घरातून बाहेर पळत येताना दिसत आहेत. रस्त्यांच्या आजूबाजूला मोडून पडलेल्या घरांचे ढिगारे या व्हिडीओंमध्ये दिसत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.