पावणेतीन कोटी खर्च : दीड वर्षापासून मुहूर्त मिळेना
अवसरी – अवसरी खुर्द येथे दोन कोटी ऐंशी लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत सुमारे गेल्या दीड वर्षे उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन कधी होणार आणि जनतेला आरोग्य सेवेचा लाभ कधी मिळणार, या आशेवर अवसरी ग्रामस्थ आहेत. ग्रामस्थांनी लवकरात लवकर याचे उद्घाटन करून प्राथमिक आरोग्य केंद्र नागरिकांसाठी खुले करण्याची मागणी केली आहे.
अवसरी खुर्द गावाच्या पूर्वेस माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली 7 फेब्रुवारी 2016 रोजी दोन कोटी ऐंशी लाख रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे तत्कालीन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते. तत्कालीन उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे आणि सभापती मंगलदास बांदल आणि बहुसंख्य मान्यवरांच्या उपस्थित या प्राथमिक आरोग्य केंद्राचे भूमिपूजन झाले. त्यानंतर या अवाढव्य इमारतीचे बांधकाम कृष्णा कन्स्ट्रक्शन लातूर या संस्थेने सुमारे दीड वर्षांच्या कालावधीत पूर्ण केले. त्यानंतर अद्याप याचे उद्घाटन करण्यात आले नाही.
अवसरी गावचा विचार करिता अवसरी खुर्द गाव हे लोकसंख्यच्या दृष्टीने तालुक्यात तिसऱ्या क्रमांकाचे गाव आहे. माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी अवसरी खुर्द हे गाव दत्तक घेतल्याने या ठिकाणी जास्तीत जास्त विकासकामे मार्गी लावण्याचा भर त्यांचा असतो. त्यानुसार दिलीप वळसे पाटील यांनी पाठपुरावा केल्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत पूर्ण झाले आहे. त्याचबरोबर आरोग्य केंद्राच्या सभोवताली संरक्षक भिंतीचे सुद्धा काम पूर्ण करण्यात आले. इमारत, अंतर्गत खोल्या, संरक्षक भिंत यांना रंगकाम होऊन सुमारे सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लोटला आहे; परंतु अद्याप इमारत उद्घाटन होण्याच्या प्रतीक्षेत आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या आधी इमारतीचे उद्घाटन होण्याची आशा ग्रामस्थांना आहे.
आचारसंहितेच्या फेऱ्यात अडकण्याआधी…
मध्यंतरीच्या काळात लोकसभा निवडणुका होत्या. त्यामुळे निवडणुका झाल्यावर आरोग्य केंद्राचे उद्घाटन होईल अशी अपेक्षा होती; परंतु निवडणुका होऊन दोन महिने झाले तरी उद्घाटन आज होईल उद्या होईल या आशेवर अवसरीकर आहेत. तीन महिन्यानंतर पुन्हा विधानसभेच्या निवडणुका येतील. त्यापूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन व्हावे अशी अपेक्षा आहे. सुमारे तीन ते पाच एकर जागेवर इमारत उभी आहे. फक्त शासनाने मशिनरी आणि लॅब टेक्निशियन, डॉक्टर, नर्स, व इतर स्टाफ यांसह फर्निचर, मशिनरी, स्टाफ यांची व्यवस्था करावी. त्यामुळे आरोग्य सेवेची आणि उपचारांची व्यवस्था निर्माण होईल.