पुणे – चीन देशासह जगभरात करोना विषाणुच्या प्रार्दुभावाने थैमान घातले आहे. या आजाराचे काही संशयित रुग्ण भारतात आढळले आहेत. यामुळे करोनापासून बचाव करण्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) संचलनादरम्यान काळजी घेण्यासाठी जनजागृती सुरू केली आहे. तसेच, राज्यातील आगारांमधील स्वच्छतागृहे, बसस्थानकांमध्ये जंतूनाशकांची फवारणी करण्याच्या सूचना महामंडळाने दिल्या आहेत.
करोना या विषाणूची लक्षणे श्वसनाशी निगडीत असून हा आजार संसर्गजन्य आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध ठिकाणी जनजागृती केली जात आहे. एसटी महामंडळाच्या बसमधून राज्यभरात दररोज लाखो प्रवाशांची वाहतूक केली जाते.
या संचलनादरम्यान चालक-वाहक व प्रवाशांचा थेट संपर्क येत असतो. यामुळे चालक व वाहकांना या आजाराविषयी माहिती देऊन आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना महामंडळाने केल्या आहेत. तसेच, करोनाविषयी कोणती दक्षता घ्यावी, या आजाराची लक्षणे या विषयीची माहिती पत्रके बसस्थानके, एसटी बसमध्ये लावण्यास सुरुवात केली आहे. तसेच, करोनाविषयी खबरदारी घेण्याबाबतचे परिपत्रक एसटी महामंडळाने राज्यभरातील विभाग नियंत्रकांना पाठविल्याचे महामंडळाने सांगितले आहे.
केवळ सूचना….मास्क कधी देणार?
करोनापासून बचावासाठी गेल्या पंधरा दिवसापूर्वीच रेल्वे, विमानतळ प्रशासनाने उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. मात्र, एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांकरिता काढलेल्या परिपत्रकात खबरदारीच्या सूचना लिहिलेल्या आहेत. परंतु, अद्यापही कर्मचाऱ्यांना मास्क पुुरविण्यात आलेले नाहीत.