पिंपरी – जगभरात हजारोंचा बळी घेणाऱ्या “करोना’ व्हायरसची लागण झालेल्या रूग्णांची धास्ती सध्या भारतालाही वाटत आहे. महाराष्ट्रात देखील करोनाचा संशयित रूग्ण आढळला आहे. करोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी सरकार उपाययोजना करीत आहे. करोनापासून दक्षता घेण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून जनजागृती करण्यात येत आहे.
दिल्ली, तेलंगणा, राजस्थानपाठोपाठ आता नाशिकमध्ये संशयित रूग्ण आढळला आहे. त्यामुळे दक्षता घेण्याचे आवाहन केले जात आहे. पिंपरी-चिंचवड शहरात असंख्य नागरिक बाहेरून दाखल होत असतात. त्या पार्श्वभूमीवर खबरदारीची उपाययोजना म्हणून महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये नवीन करोना विषाणू रूग्णांसाठी स्वतंत्र अतिदक्षता कक्ष सुरू करण्यात आला आहे. नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी. सार्वजनिक ठिकाणची गर्दी टाळावी. वारंवार हात स्वच्छ ठेवावे. मास्कचा वापर करावा, असे आवाहन महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी केले आहे.
डॉ. साळवे म्हणाले, करोना व्हायरसबाबत नागरिकांनी कशा प्रकारे काळजी घ्यावी, याबाबत जनजागृती करण्यासाठी चौकांमध्ये फलक लावण्यात आले आहेत. डॉक्टरांच्या बैठका घेण्यात आल्या आहेत. त्यांना सातत्याने सूचना दिल्या जात आहेत. करोना रुग्णांसाठी वायसीएममध्ये स्वतंत्र कक्ष तयार केला आहे. त्यामुळे अचानक रुग्ण आल्यास त्याला दाखल करून घेता येईल. करोना विषाणूबाबत राज्य सरकारने दिलेल्या सूचनांप्रमाणे आरोग्य विभागाचे काम सुरू आहे.