पुणे – प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या स्कॉच पुरस्कारांवर यंदाही पुणे स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांनी मोहोर उमटविली आहे. स्मार्ट सिटीच्या 3 प्रकल्पांना सहा पुरस्कार मिळाले आहेत. या प्रकल्पांमध्ये स्मार्ट ई- बस, इंटिग्रेटेड कमांड ऍन्ड कंट्रोल सेंटर तसेच सेफ्टीपिन या प्रकल्पांचा समावेश आहे, अशी माहिती पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांनी दिली.
असे आहेत पुरस्कारप्राप्त प्रकल्प
स्मार्ट ई-बस : शहरासाठी टिकाऊ वाहतुकीचे जाळे निर्माण करण्याचे आणि प्रदूषणाची पातळी कमी करण्याच्या उद्देशाने पुणे स्मार्ट सिटी आणि पीएमपीने ई-बस प्रकल्पाची कल्पना केली. एकूण 150 बसेसपैकी सध्या 125 हून अधिक बसेस सेवेत आहेत.
इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर (आयसीसीसी): पीएससीडीसीएलचे इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर शहर प्रशासन आणि तिचे हितधारकांना रिअल-टाइम डेटासह माहिती योग्य निर्णय घेण्यास सक्षम करते. पावसाळी हंगामात पूर सेन्सरच्या सूचनांमुळे बचाव कार्य आणि आपत्ती पथकाच्या कामात मदत झाली. होम आयसोलेशन ट्रॅकिंग, कॉन्टॅक्ट ट्रॅकिंग, को-मॉर्बिड सर्वेक्षण, हॉटस्पॉट्स आणि कंटेनमेंट झोन परिभाषित करण्याच्या अधिक चांगल्या व्यवस्थापनासाठी आयसीसीसीला प्रमुख कोविड-युद्ध कक्षात रूपांतरित केले गेले.
सेफ्टीपिन: सेफ्टीपिन ऍप्लिकेशन हा एक अनोखा प्रकल्प आहे, ज्यामुळे नागरिकांना शहरातील रस्ते ओळखण्यास सक्षम केले जे कोणत्याही वेळेला प्रवास करण्यास सुरक्षित असतात. सेफ्टीपिन नाइट ऍपचा वापर करून 50,000 पेक्षा जास्त प्रतिमा एकत्रित करून शहरासाठी सुरक्षा मॅपिंग केले.